माहिती अधिकार अपिलांवरील सुनावणी आता सर्वांसाठी खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:11 IST2025-06-19T12:10:33+5:302025-06-19T12:11:31+5:30

RTI: कोकण खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय 

Konkan Bench of the State Information Commission Right to Information Act | माहिती अधिकार अपिलांवरील सुनावणी आता सर्वांसाठी खुली

माहिती अधिकार अपिलांवरील सुनावणी आता सर्वांसाठी खुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : माहिती अधिकार अधिनियमांतर्गत दाखल अपिलांवरील सुनावणी आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने घेतला आहे. १६ जूनपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे माहिती अधिकार प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे.

पारदर्शकता, अधिक लोकाभिमुख 
राज्य माहिती आयोगाच्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १५(४) नुसार खुल्या सुनावणीला मान्यता दिली होती. त्यानुसार १६ जून २०२५ पासून कोकण खंडपीठात होणाऱ्या द्वितीय अपिलांवरील सुनावण्या सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या आहेत. या निर्णयामुळे माहिती अधिकाराची प्रक्रिया अधिक खुली, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास राज्य माहिती आयोगाने व्यक्त केला आहे.

असे असतील नियम 
- खुल्या सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष सुनावणीत अपीलकर्ता, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाच सहभागाची परवानगी असेल. 
- इतर नागरिकांना केवळ अभ्यागत म्हणून उपस्थित राहता येईल. मात्र, बोलण्यास किंवा प्रक्रिया हस्तक्षेप करण्यास परवानगी नसेल. सर्व उपस्थितांनी राज्य माहिती आयुक्तांचा सन्मान राखणे बंधनकारक असेल. 
- मोबाइल बंद ठेवणे आवश्यक असून,  ध्वनिचित्रमुद्रण करता येणार नाही.  त्रयस्थ व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई केली जाऊ शकते, असे चन्ने यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Konkan Bench of the State Information Commission Right to Information Act