मिरज (जि.सांगली) : मिरजेतील कत्तलखाना परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिन्मयी उमेश कारंडे या दोन वर्षाच्या बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने नगरविकास सचिवांना दिले आहेत. मात्र नगरविकास विभागाने अद्याप ही भरपाई दिली नसल्याने, नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे मानवाधिकार संघटनेचे सुरेश हराळे, अॅड. मनीष कांबळे, व दीपक ढवळे यांनी रविवारी सांगितले.बेडग रस्त्यावर सांगली-मिरज महापालिकेच्या कत्तलखान्याजवळ मोकाट कुत्र्यांचा वावर कायमच आहे. ३० एप्रिल २०१० रोजी चिन्मयी कारंडे या बालिकेवर अशाच मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाला होता.चिन्मयीच्या मृत्यूबाबत हराळे, कांबळे व दीपक ढवळे यांनी सांगली-मिरज महापालिका व पोलिस प्रशासनाविरूध्द राज्य मानवी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सुनावणीनंतर राज्य मानवी हक्क आयोगाने १० एप्रिल २०१७ रोजी नगरविकास मंत्रालयास, मृत चिन्मयीच्या कुटुंबियांना १५ लाख रूपये नुकसान भरपाई तीन महिन्यात देण्याचे आदेश दिले. तीन महिन्यात भरपाई न दिल्यास साडेबारा टक्के व्याजासह भरपाईचे आदेश दिले.
कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाख द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:43 IST