मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 23:59 IST2025-07-22T23:59:05+5:302025-07-22T23:59:39+5:30
Kalyan Crime News: कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला बेदम मारहाण करून पळून गेलेला परप्रांतीय तरुण अखेर सापडला आहे. गोकुल झा असं या तरुणाचं नाव असून, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढून बेदम चोप दिला.

मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले
कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला बेदम मारहाण करून पळून गेलेला परप्रांतीय तरुण अखेर सापडला आहे. गोकुल झा असं या तरुणाचं नाव असून, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गोकुल झा याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. आता या प्रकरणाती पुढील तपास सुरू आहे.
कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने किरकोळ वादानंतर मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. तसेच हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता. मात्र मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी गोपाल झा हा फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनीही त्याला पकडण्यासाठी इशारा दिला होता. दरम्यान, हा गोकुल झा लपून बसलेल्या ठिकाणाचा ठावठिकाणा लागल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढत बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. आता या गोकुल झा याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून, बुधवारी त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पीडित तरुणीने तिच्यासोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेची माहिती देताना सांगितले होते की, "मी बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. हा इसम अनन्या झा नावाच्या रुग्णाबरोबर आला होता. मी पहिल्यांदाच त्याला इथे पाहिले. तो आतमध्ये जाण्यासाठी खूप घाई करत होता. मी त्याला एवढंच बोलले की, तुमचा सध्या नंबर नाहीये, तुम्ही १० मिनिटे वाट बघा. तर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ केल्यानंतर मी ही व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने बोलत नाही आहे, असे आमच्या सरांना सांगितले.. मी त्याला असेही सांगितले की तू माझ्याशी नीट बोल. तर तो माणूस माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि त्यानंतर माझे केस पकडून दरवाजापर्यंत मला खेचत खेचत नेले. मला त्यांनी एवढे मारलं की माझा श्वासही थोड्या क्षणांसाठी थांबला होता, असे पीडित तरुणीने सांगितले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गोकुल झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.