kadaknath scam farmer pramod jamdade suicide in Kolhapur | कडकनाथ घोटाळ्याचा कोल्हापूरात पहिला बळी

कडकनाथ घोटाळ्याचा कोल्हापूरात पहिला बळी

मुंबई : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले होते. तर याच रयत ऍग्रो संस्थेकडे अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केल्याने नैराश आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

प्रमोद जमदाडे असे या तरुणाचे नाव असून तो पन्हाळा तालुक्यातील माले या गावचा रहिवासी आहे. प्रमोद जमदाडे यानं वर्षभरापूर्वी इस्लामपूरच्या रयत ॲग्रोकडं अडीच लाख रुपये भरले होते. त्याने शेड आणि अन्य खर्च यासाठी अडीच लाख रुपये गुंतवणूक केली होती. रयत ॲग्रो कंपनीतील घोटाळ्यामुळं प्रमोदचे आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळे तो सतत चिंतेत असायचा.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यासमोर कडकनाथ कोंबडी सोडल्याने या घोटाळ्याचा विषय अधिकच चर्चेत आला होता. त्यांनतर यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी रयत ऍग्रोच्या विरोधात लढा उभा केला होता. तर कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) तपास केला जावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली होती.

तर प्रमोद जमदाडे प्रमाणेच राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून या प्रकल्पात पैसे गुंतवले आहे. त्यामुळे रयतमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. तसेच रयतचा प्रमुख सागर सदाभाऊ खोत याची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी आज कोल्हापुरात जमदाडे यांच्या आत्महत्येनंतर अनेक गुंतवणूकदारांनी केली.

 

 

 

 

Web Title: kadaknath scam farmer pramod jamdade suicide in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.