"शरद पवारांच्या नंतर मी 'यांना' आपला नेता मानतो"; जितेंद्र आव्हाडांनी मांडलं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:46 IST2025-02-16T16:44:42+5:302025-02-16T16:46:10+5:30
Jitendra Awhad, Sharad Pawar NCP : महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक असलेले नेतृत्व, असेही आव्हाड यांनी त्या नेत्याबद्दल म्हटले आहे

"शरद पवारांच्या नंतर मी 'यांना' आपला नेता मानतो"; जितेंद्र आव्हाडांनी मांडलं रोखठोक मत
Jitendra Awhad, Sharad Pawar NCP : राजकारणात केव्हा काय घडेल याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण तर भलतंच बदलून गेलं. शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष फुटला. या दोघांनी भाजपासोबत महायुतीचे सरकार आणले. इतके धक्के बसूनही राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे राजकारणात पाय रोवून उभे आहेत. अजूनही राज्यात बरेच लोक शरद पवार यांनाच आपला नेता मानतात. त्यांच्यानंतर कोण? याबाबत सुप्रिया सुळे ( Supriya Sule ), जयंत पाटील ( Jayant Patil ) किंवा आणखीही नावे घेतली जातात. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, शरद पवार यांच्यानंतर ते कुणाला नेता मानतात, याचे उत्तर आज एका ट्विटमधून दिले.
मी शरद पवार यांच्यानंतर ज्यांना आपला नेता मानतो, ते म्हणजे शप गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आव्हाडांनी एक पोस्ट ट्विट केली. त्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आज जयंत राजाराम पाटील म्हणजेच आमचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि प्रगल्भ नेतृत्व यांचा वाढदिवस ! त्यांच्या गुणावर माझे प्रचंड प्रेम आहे. तेदेखील माझ्यासारखेच प्रचंड 'आईवेडे' आहेत. आजही आई हा शब्द निघाला की त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. कधीही कोणावरही न चिडणारा, सर्वांचे म्हणणे गप्प बसून ऐकणारा, असा राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच!"
आज श्री. जयंत राजाराम पाटील म्हणजेच आमचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि प्रगल्भ नेतृत्व यांचा वाढदिवस !
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 16, 2025
त्यांच्या गुणावर माझे प्रचंड प्रेम आहे. ते म्हणजे तेदेखील माझ्यासारखेच प्रचंड 'आईवेडे' आहेत. आजही आई हा शब्द निघाला की त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात.… pic.twitter.com/qHCeLQpd39
"हसत खेळत लोकांच्या टोप्या उडवणारा पण, संघटनेतील प्रत्येकाच्या स्वभावाची ओळख असणारा, संघटनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणारा, अर्थात हा भ्रमणाचा गुण त्यांना वडिलांकडून मिळालाय. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी जेव्हा भारत यात्रा केली होती. तेव्हा राजाराम पाटील हे त्यांच्यासोबत सबंध महाराष्ट्र फिरले होते. एका कर्तृत्ववान बापाचा कर्तृत्ववान मुलगा, ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवली. सर्वांशी हसत खेळत वागणारा आणि कोणावरही न चिडणारा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही. त्यांचा स्वभावगुण पाहता महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक असलेले ते नेतृत्व आहे. पण नशिबाने अजून तरी साथ दिलेली नाही. पण ते नशिब आज ना उद्या उघडेल, याची मला खात्री आहे. अशा या माझ्या आवडत्या नेत्याला, ज्यांना मी शरद पवार यांच्यानंतर आपला नेता मानतो, अशा जयंत पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!" अशा शब्दांत त्यांनी ट्विट करत जयंत पाटलांना शुभेच्छा दिल्या.