राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 07:45 IST2025-07-18T07:45:05+5:302025-07-18T07:45:51+5:30
Jitendra Awhad- Gopichand Padalkar Clash: आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात जात असताना पडळकर ऋषिकेश टकलेसोबत चर्चा करत होते...

राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता शुक्रवारी होणार असल्याने गुरुवारी विधिमंडळाचे आवार कार्यकर्त्यांच्या गर्दीने जत्रेसारखे फुलून गेले होते. दोन्ही सभागृहातही कामकाजाची लगबग सुरू होती. अशातच बाहेर राडा झाला.
या राड्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यामध्ये असे दिसते की, राडा होण्याच्या काही क्षण अगोदर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात जात असताना आमदार गोपीचंद पडळकर ऋषिकेश टकलेसोबत चर्चा करत होते. त्याचवेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. नितीन देशमुख आत जाताच बाहेरून टकले आत गेला आणि त्याने देशमुखला मारायला सुरूवात केली. काही क्षण ही फ्री-स्टाईल हाणामारी सुरू होती. हा राडा झाल्यानंतर पडळकर माध्यमांसमोरून हसत निघून गेले आणि पत्रकारांना ‘आत जाऊन त्याला बघा,’ असे म्हणाले.
पडळकरांना मारहाण, भाजपचा दावा
विधानभवनाच्या पायऱ्यांवर पडळकर यांना मारहाण झाल्याचा दावा भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत केला. विधानभवनात आमदारांवर हल्ला होत असेल तर याची सखोल चौकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी उपाध्याय यांनी केली. त्वरित प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिले.
याबाबत सरकारची भूमिका मांडताना मंत्री आशिष शेलार म्हणाले, सरकारने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे. मारहाणीच्या घटनेत अग्रसेर कोण होता, याला खतपाणी घालणारा कोण होता याची चौकशी केली जाईल. सत्ताधारी किंवा विरोधक कुठल्याही सदस्याला मारहाण होणे हे गंभीर आहे, पण विधानभवनात गर्दी होते, मंत्री लॉबीत आला तर त्याला लोक घेरतात, मोबाइलवर फोटो काढले जातात. मोबाइल आत आणायला बंदी घालता येईल का याचा विचार केला पाहिजे.
विधान परिषदेतही पडसाद
मारहाणीचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात आ. पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची सभागृह लॉबीत मारामारी सुरू आहे. काय चालू आहे सभागृहात? असा सवाल करत कायदा सुव्यवस्थेवर चर्चा आहे आणि आमदार खाली मारामारी करतात, असे सांगितले. त्यावर सभापती प्रा. राम शिंदे यांनी सरकारला निवेदन करण्यास सांगितले असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती घेऊन सभागृहाला अवगत केले जाईल, असे सांगितले.
हा प्रकार कशामुळे ?
हा सगळा प्रकार कशामुळे झाला, आधी मंगळसूत्र चोर असे ओरडत कोण गेले त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली, तर आम्ही विधानसभेत आक्रमकपणे मुद्दे मांडतो उद्या आमदारावर हात उचलण्यास कुणी कमी करणार नाही, असे सुनील प्रभू म्हणाले.
अध्यक्ष, सभापतींच्या भूमिकेकडे लक्ष
विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांनी याबाबत सध्यातरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी कामकाजाच्या शेवटच्या सभागृहात दोघे कारवाई संदर्भात काय भूमिका मांडतात आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काय पावले उचलतात, याबाबत उत्सुकता आहे.
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांकडे पार पडलेल्या बैठकीतही सर्वांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत विधानभवनाची गरिमा कायम ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
विधानभवनात प्रचंड गर्दी होती. आम्ही लॉबीमध्ये चालू शकत नाही. त्यातच अशा प्रकारामुळे धावपळ झाली. अशा वेळी महिलांचे संरक्षण कोण करणार? असा प्रश्न आमदार सना मलिक यांनी केला.
हा विषय सगळ्यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे, या प्रांगणात जर असे गुंड येऊन मारामारीत करायला लागले तर अर्थ काय राहतो. मी कारवाईची मागणी करतो आहे.
उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना
पंचवीस वर्षांपासून आम्ही या सभागृहात आहोत. पहिल्यांदा असे चित्र बघायला मिळाले. कुणी केले असेल ते चुकीचे असून लोकशाहीसाठी घातक आहे. असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री
पडळकर किंवा आव्हाड यांचे कार्यकर्ते अशी मारामारी करत असतील तर ती लोकशाहीची हत्या आहे. भविष्यात अशा प्रकारची कृत्य कुणाकडून होऊ नये यासाठी कठोर कारवाई केली पाहिजे.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
सर्वांत जास्त लोक सत्ताधारी पक्षाच्या लोकांबरोबर येतात. सत्ताधारी पक्षाने गर्दी केली त्याचे परिणाम आहेत. या हाणामारीचे मी समर्थन करणार नाही.
नाना पटोले, नेते, काँग्रेस