जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:32 IST2024-12-09T17:32:27+5:302024-12-09T17:32:57+5:30
जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..."
मुंबई : आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सभागृहात बोलताना जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा आपल्या पक्षाचा नियम असल्याचे म्हटले. त्यावरून आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते अमोल मिटकरी भाष्य केले आहे. जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. मधली ओळ अशी आहे की, लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ते असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार, म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय ते घेणार आहेत. गेल्या वेळच्या महायुतीच्या सरकारच्या 10 कॅबिनेट बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना बोलावलं होतं. मागच्या वेळी त्यांनी प्रयत्न केले होते, पण ती योग्य वेळ नव्हती. त्यांना आवाहन करायला मी मोठा नाही, असे अमोल मिटकरी म्हणाले.
याचबरोबर, जयंत पाटील यांच्यासाठी देवगिरीची दार अखंड खुली आहेत. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, तो आम्हालाच काय भाजपला पण हवाहवासा वाटतो. ड्राईव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव ते उत्तम चालक आहेत, वेळ पडली तर स्टेरिंग त्यांच्या हाती देऊ. रथ कोणी हाकलावा हा नंतरचा भाग. मात्र, जयंत पाटील यांचे आजचे विधान महाराष्ट्राला खूप काही सांगून जाणारं आहे, असे सूचक विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे.
सभागृहात नेमंक काय म्हणाले जयंत पाटील?
आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर जयंत पाटील यांनी भाषण केले. यावेळी विधानसभा अध्यक्षांचा मान किती मोठा असतो, याबाबत ते बोलत असताना म्हणाले की, मी 90 साली पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असे म्हणाले. त्याचवेळी अजित पवार म्हणाले की, तुम्ही अध्यक्ष नाही आमदार झालात, तेव्हा जयंत पाटील यांनी सारवासारव करत म्हटलं की, बघा अजितदादांचं माझ्यावर किती लक्ष आहे, तेव्हा अजित पवार लगेच म्हणाले की, माझं तुमच्यावर लक्ष आहे, पण तुम्ही कधी प्रतिसाद देतांय, तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे, योग्य वेळी योग्य निर्णय. दरम्यान, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.