"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:51 IST2025-03-11T19:49:09+5:302025-03-11T19:51:03+5:30
विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनाही दूर सारण्याचा प्लॅन केलेला आहे, असे विधान केले.

"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान
Jayant Patil Maharashtra Budget News: 'या अर्थसंकल्पाचं वर्णन करताना दुर्दैवाने मला हेच सांगावं लागतंय की, बडा घर आणि पोकळ वासा. २३७ आमदारांचं बहुमत सरकारच्या मागे आहे आणि ज्यांनी बहुमत दिलं, ते फार आशा करून महाराष्ट्रातील जनता टीव्ही समोर बसली होती. त्यांच्या पदरी निराशा आली', असे म्हणत जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर बोलताना महायुतीवर टीका केली. गेल्या सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करत 'एकनाथ शिंदेंना दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे', असेही ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधानसभेत मंगळवारी अर्थसंकल्पावर चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, "मागच्या भाषणात अजितदादांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण, यावेळी तुकोबांना दादांनी दूर केलं आहे. आणि प्रश्न असा आहे की, का अजितदादा तुकोबांपासून दूर गेले? हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता एकनाथलाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे", असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना लगावला.
याच मुद्द्याला धरून जयंत पाटील पुढे म्हणाले की, "एकनाथरावांनी जे काही निर्णय घेतलेले, आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना याचा काही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाचं हे एक वैशिष्ट्ये आहे."
जयंत पाटील म्हणाले, 'प्राण जाए पर वचन ना जाए'
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांवरूनही जयंत पाटलांनी महायुती सरकारला घेरले. ते म्हणाले, "प्रभू रामाचा उल्लेख भाषणात झाला. रामटेकला सांस्कृतिक महोत्सव करणार आहेत. पण, असं म्हटलं जातं की, 'रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए.' विधानसभेच्या निवडणुकीआधी जी वचनं आपण महाराष्ट्राला दिली. माझ्याकडे मोठा गठ्ठा आहे. त्यात संकल्प पत्र २०२४चा. त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही", असे म्हणत जयंत पाटलांनी सरकारला कोंडीत पकडले.
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कशी होणार? पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
"कोरोना काळात शिवभोजन थाळीने लोकांना आधार दिला. ती थाळी बंद होऊ नये, एवढी अपेक्षा करतो. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे मुख्यमंत्री सतत सांगतात. त्यासाठी आपल्या राज्याच्या विकास वाढीचा दर १४-१५ टक्क्यांवर गेला पाहिजे. मागच्या वेळी तो, ८ टक्के होता, तो आता ७.३ टक्के खाली आला. त्यामुळे ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी होणार आणि कधी होणार?", असा सवालही जयंत पाटलांनी केला.