जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट, १ तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:11 IST2025-02-25T17:10:28+5:302025-02-25T17:11:06+5:30
Jayant Patil News: राज्य सरकामधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच भेट झाली. ही भेट काल मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी झाल्याचं वृत्त असून, या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट, १ तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीला पुन्हा एकदा वेग आला आहे. शिंदे गट ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाला बेजार करत आहे. तर भाजपामध्येही इतर पक्षांमधून इनकमिंग होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन बड्या नेत्यांची मध्यरात्री भेट झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राज्य सरकामधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच भेट झाली. ही भेट काल मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी झाल्याचं वृत्त असून, या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, मध्यरात्री झालेल्या या भेटीची माहिती समोर आल्यापासून चर्चांना उधाण आलं आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल मध्यरात्री ही भेट झाली. जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात झालेल्या या भेटीवेळी भाजपाचे आणखी एक ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते, असा दावाही करण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्यावर निष्ठा व्यक्त करून शरद पवार गटामध्ये राहिले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगली कामगिरीही केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाचा दारुण पराभव झाला होता. त्या पराभवानंतर जयंत पाटील हेही शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देतील अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र तेव्हा जयंत पाटील या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.