Jalgaon, Sangli Election Results: मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावर विश्वास- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:04 IST2018-08-03T18:01:55+5:302018-08-03T18:04:29+5:30
जळगाव, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय

Jalgaon, Sangli Election Results: मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावर विश्वास- मुख्यमंत्री
मुंबई- राज्यातील मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावरील विश्वास कायम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील घवघवीत यशानंतर दिली आहे. सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत. मात्र तरीही जनतेचा भाजपा आणि राज्य सरकारवरील विश्वास कमी झालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. जळगाव आणि सांगली महापालिकेत भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सांगली आणि जळगावातील जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला. त्याबद्दल आम्ही तेथील जनतेचे आभारी आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मराठा मोर्चांवरही भाष्य केलं. 'सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत. मात्र हा प्रश्न आता निर्माण झालेला नाही, हे जनतेला माहित आहे. हा प्रश्न 40 ते 50 वर्ष जुना आहे, याची कल्पना जनतेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सरकार सोडवेल, असा विश्वास राज्यातील जनतेला आहे,' असं फडणवीस म्हणाले. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला आहे. जनतेनं दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.