आयटी कंपनी शोषण; कधी कर्ज, मदतीचे आमिष; ‘सॉफ्ट टार्गेट‘ हेरून महिलांना लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:19 IST2026-04-12T06:17:44+5:302026-04-12T06:19:24+5:30
Nashik IT company exploitation: बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिलांचे शोषण तसेच धर्मांतरणाचा प्रयत्न याप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती बाहेर येत आहे.

आयटी कंपनी शोषण; कधी कर्ज, मदतीचे आमिष; ‘सॉफ्ट टार्गेट‘ हेरून महिलांना लक्ष्य
नाशिक - बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिलांचे शोषण तसेच धर्मांतरणाचा प्रयत्न याप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. पीडितांची असाहाय्यता आणि गरज हेरून संबंधित आरोपी कधी त्यांना कर्जाचे, कधी मदतीचे, तर कधी करिअरचे आमिष दाखवत आणि प्रसंगी दबावतंत्राचा वापर करत आपल्या जाळ्यात ओढत असल्याची माहिती तपासादरम्यान उघड होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पीडितेला कर्ज मिळत नव्हते, तेव्हा अमुक बँकेतून कर्ज मिळवून देतो, जामीनदारही होतो, असे सांगून आरोपींपैकी एकाने पीडितेशी जवळीक साधली; तर दुसऱ्या संशयित आरोपीने अन्य पीडितेला दुचाकी घेण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवून मैत्रीच्या जाळ्यात ओढले. एका विवाहित असलेल्या पीडितेला तर वैवाहिक आयुष्यात संतती नसल्याने त्याबाबतचे उपाय सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला गेल्याचे सांगण्यात येते.
आरोपींचे मोबाइल जप्त
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार तसेच धर्मांतर प्रयत्नांच्या प्रकरणातील संशयित सहाही आरोपींचे मोबाइल जप्त करण्यात आले असून, ते क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे देण्यात आले आल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख संदीप मिटके यांनी दिली.
फरार महिला झाली सावध
या संपूर्ण प्रकरणात जी महिला फरार आहे, ती नाशिकचीच असून प्रकरण वाढू लागल्यावर तसेच या बाबीचा गाैप्यस्फोट होऊ शकतो, याची कुणकुण या महिलेस लागल्याने तिने सावध होत कंपनीतून राजीनामा दिला होता.