तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:54 IST2025-07-31T15:51:09+5:302025-07-31T15:54:45+5:30
Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे यांना तूर्त अभय दिल्यानंतर आता धनंजय मुंडे समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्याचे म्हटले जात आहे.

तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
Manikrao Kokate News: विधान परिषद सभागृहात मोबाइलवर पत्ते खेळल्याने आणि वादग्रस्त विधाने केल्याने मंत्रिपद जाण्याची वेळ आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर्त अभय दिले आहे. मात्र, यापुढे वागण्या-बोलण्याबाबत एकही चूक केली तरी घरी जावे लागेल, असा सज्जड दमही त्यांनी कोकाटे यांना दिल्याचे समजते. अलीकडेच शनि मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा हा परिणाम तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या अँटिचेम्बरमध्ये बोलविले आणि दहा मिनिटे क्लास घेतला. वादग्रस्त विधाने, पत्ते खेळणे असले प्रकार एका मंत्र्याला शोभणारे नाहीत. एकदा, दोनदा सांगूनही तुम्ही बडबड सुरूच ठेवली आहे, हे बरोबर नाही. मी, सुनील तटकरे यांनी सांगूनही तुम्ही ऐकत नाही याचा अर्थ तुम्हाला पक्षनेतृत्वाचाही धाक नाही, असा त्याचा अर्थ होतो. झाले ते खूप झाले. खरेतर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे; पण आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन आणि यापुढे आपण कुठलेही गैरवर्तन करणार नाही, या अटीवर तुम्हाला तूर्त मंत्रिपदी ठेवतो. दर आठ-पंधरा दिवसांनी मला तुमच्या वागण्या-बोलण्यावर नजर ठेवावी लागेल आणि काही चुकीचे आढळले तर मंत्रिपद काढावे लागेल, अशा कडक शब्दांत अजित पवार यांनी कोकाटेंची कानउघाडणी केल्याचे समजते.
माणिकरावांना शनिदेवच पावला!
विधान परिषद सभागृहात मोबाइलवर पत्ते खेळत असल्याची व्हिडिओ क्लिप आणि त्याआधी काही वादग्रस्त वक्तव्ये, यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार अशीच चिन्हे गेले काही दिवस होती. या वातावरणात कोकाटे नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ इथल्या शनिमंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावर आ. रोहित पवार यांनी, 'तुम्ही चुका करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे शनिमहाराज कधीही सांगत नाहीत', असा टोला त्यांना लगावला. मंगळवारी कोकाटे राजीनामा देणार, अशी चर्चा राज्यात सुरू असतानाच, अजित पवार यांनी त्यांना अँटीचेंबरमध्ये बोलावून केवळ दम दिला, पण मंत्रीपद कायम ठेवले. त्यामुळे कोकाटेंना शनिदेवच पावला, असे म्हणायला हरकत नाही, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, न्यायालयाने माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी प्रकरणात निर्दोष ठरवले. यामुळे मुंडे तब्बल दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा राजकीय जीवनात सक्रिय झाल्याचे दिसले. त्यांची जाहीर सभा झाली, ते माध्यमांसमोर आले. आणखी एका प्रकरणात क्लीनचिट मिळाल्यास त्यांना मंत्रिमंडळात घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यातच कोकाटे यांचे मंत्रिपद जाण्याच्या शक्यतेने मुंडे समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या. पण कोकाटे यांना पवार यांनी अँटीचेंबरमध्ये उपदेशाचे 'डोस' पाजत त्यांचे मंत्रिपद कायम ठेवले. इथे मात्र मुंडे यांचा हिरमोड झाला नसेल, यावर कोणाचा विश्वास बसेल? हा मुद्दा राजकीय वर्तुळाच चर्चेचा विषय ठरला आहे.