शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:49 IST2025-08-07T10:46:51+5:302025-08-07T10:49:57+5:30
NCP Sharad Pawar Group News: रोहित पवार प्रचंड सक्रिय झालेले पाहायला मिळत असून, त्यापुढे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मात्र 'नामधारी' झाल्याची चर्चा सुरू आहे.

शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
NCP Sharad Pawar Group News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेंबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वाढत्या भेटीगाठी, ठाकरे बंधू एकत्र येऊन युती होण्याची चर्चा, महाविकास आघाडीचे भवितव्य आणि महायुतीवर होणारा परिणाम अशा अनेक चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मात्र नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत नाराजीचा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटला. एका बैठकीत नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. अखेर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शशिकांत शिंदे यांच्या हाती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. यातच रोहित पवार यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर रोहित पवारच अधिक सक्रिय झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नवे प्रदेशाध्यक्ष नामधारी?
शरद पवार गटाचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी रोहित पवार यांची प्रदेश सरचिटणीस आणि सर्व फ्रंटल सेलच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून रोहित प्रचंड सक्रिय झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत. मग ते आ. संजय गायकवाड आमदार निवास मारहाण असो की मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील बॅग, बीड हत्या प्रकरण, शिक्षकांचे आंदोलन, माणिकराव कोकाटेंचा पत्त्यांचा व्हिडीओ आणि आता दादरचा कबुतरखाना. त्यांच्या सक्रियतेपुढे नवे प्रदेशाध्यक्ष मात्र 'नामधारी' झाल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर राज्याचे राजकारणात ठिणगी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आरती साठे यांच्या नियुक्तीवरून नाराजी व्यक्त केली आहे. सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे चुकीचे आहे, असे मत आमदार रोहित पवारांनी मांडले आणि त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. सध्याची राजकीय परिस्थिती बदलली असून स्वायत्त संस्थांचा वापर राजकीय हेतूसाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.