जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:25 IST2025-08-10T12:21:37+5:302025-08-10T12:25:54+5:30
Sanjay Raut News: मुळात ते आहेत ना की त्यांना कुठे गायब केले आहे? जगदीप धनखड यांचा ठावठिकाण कोणाला लागत नसेल, तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
Sanjay Raut News: देशाला अजूनही उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही जगदीप धनखड यांनाच उपराष्ट्रपती मानतो. जगदीप धनखड हे २१ जुलैपासून बेपत्ता आहेत. देशाची उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती, राज्यसभेचे चेअरमन २१ जुलै रोजी सकाळी राज्यसभेत आमच्यासमोर आले. त्यांची आमची चर्चा झाली. त्यांनी काही आदेश दिले, त्यानंतर सभागृह स्थगित झाले. त्यांची प्रकृती उत्तम होती, खणखणीत होती. ते काही काळ चिडले असतील, हास्यविनोद केले असतील, त्यांनी संवाद साधला आणि संध्याकाळी सहानंतर बातमी आली की, जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. हे आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे, इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो. पण, जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून आजपर्यंत ते आहेत तरी कुठे? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. जगदीप धनखड यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे? ते काय करत आहेत? ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे? ते बरे आहेत ना? मुळात ते आहेत ना की त्यांना कुठे गायब केले आहे का? या शंका आमच्या मनात येत आहेत. देशाचे माजी उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाले असतील आणि त्याचा ठावठिकाण कोणाला लागत नसेल, तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे आणि त्यातील काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का? उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरेंना भेटले, तेव्हा आम्ही चर्चा केली. तेव्हा आमचे असे ठरत आहे की, आम्ही न्यायालयात याचिका दाखल शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरचे राज्यपाल करा असे सांगायला गेले असतील
एकनाथ शिंदे यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. ठीक आहे. पर्यटनाला जातात, येथे महाराष्ट्रात काहीही काम नाही. महाराष्ट्रात फडणवीस त्यांचा भ्रष्टाचार त्यांची अरेरावी हे मान्य करत नाही. त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते जात असले तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे. कदाचित जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा. जम्मू-काश्मीर पाहून येतो ते पाहायला गेले असतील. महाराष्ट्रात काही काम नाही. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा, अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी जे पुरावे समोर ठेवले आहेत, त्याची शहानिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी केले तर हे निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्याने डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि तोंडात बोळा आहे अशा निवडणूक आयोगामध्ये उद्या लॉंग मार्च असणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात हे जे फडणवीस-शिंदे-पवार महायुतीचे सरकार आहे. त्यांचा जो भ्रष्टाचार आहे, त्यांचे जे घोटाळे आहेत, त्यांचे कलकित मंत्री अशा अनेक मुद्द्यांवर विधिमंडळात अनेकदा आवाज उठवून देवेंद्र फडणवीस या सरकारचे दिल्लीतील नेते मोदी आणि शहा हे ऐकायला तयार नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालत आहे. त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणे हा आमच्याकडे पर्याय आहे. स्वतः उद्धव ठाकरे दादरच्या आंदोलनात सहभागी असतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.