"सुरत पाकिस्तानात आहे का?" सुरतला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक झाल्याने काँग्रेसचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 19:00 IST2023-04-03T19:00:15+5:302023-04-03T19:00:45+5:30
Nana Patole Criticize Gujarat Police: मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला

"सुरत पाकिस्तानात आहे का?" सुरतला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक झाल्याने काँग्रेसचा संतप्त सवाल
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सुरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरातपोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
यासंदर्भात माहिती देताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातून सुरतला जाणाऱ्यांना सीमेवर अडवण्यात आले. सुरतमध्ये येणास पोलीसांची मनाई होती. सुरत व परिसरात कर्फ्युसारखी परिस्थिती दिसत होती. अनेक कार्यकर्त्यांचे फोन जप्त करण्यात आले. आय. डी. कार्ड जप्त करण्यात आले. व्हिडिओ रेकॉर्डिंगही करु दिले नाही. सुरत भारतात आहे का पाकिस्तानात असे चित्र दिसत होते. हा प्रकार लोकशाही संपुष्टात आणण्याचा आहे.
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनीही गुजरातपोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरत येथे जात असलेल्या राज्यभरातील नेते व कार्यकर्त्यांना गुजरात पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवून ताब्यात घेतले, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, हे निषेधार्ह आहे. गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी आहे.
राहुल गांधी हे देशासाठी, लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत. या लढाईत त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुरतमध्ये येत असताना गुजरात पोलिसांनी त्यांना महाराष्ट्राच्या सीमेवरच थांबवले. राहुल गांधींना या लढाईत जनतेची साथ मिळू नये याची जणू खबरदारीच गुजरात पोलीसांनी घेतली होती, याचा आम्ही निषेध करतो.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही गुजरात पोलिसांच्या दंडेलशाहीचा निषेध केला, ते म्हणाले की, सुरतला जाणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडविण्यात येत असल्याच्या बातम्या सकाळपासून येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर गदा आलीच आहे; आता मुक्त भ्रमणाचा अधिकार देखील काढून घेण्यात आला आहे की काय? असा संताप चव्हाण यांनी व्यक्त केला.