शरद पवारांचे खासदार सुनील तटकरेंच्या संपर्कात आहेत का?; अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:35 IST2025-01-09T17:32:39+5:302025-01-09T17:35:01+5:30
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी संपर्क केल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर आता अजित पवारांनीच खुलासा केला आहे.

शरद पवारांचे खासदार सुनील तटकरेंच्या संपर्कात आहेत का?; अजित पवार म्हणाले...
Maharashtra News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांशी सुनील तटकरेंनी संपर्क केल्याच्या वृत्ताची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे वगळता इतर खासदारांना अजित पवारांसोबत येण्याचे सुनील तटकरेंनी म्हटल्याचे आरोप केले गेले. याच मुद्द्याबद्दल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सविस्तर भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजित पवारांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. अजित पवारांना असा प्रश्न विचारण्यात आला की, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत का?
या प्रश्नावर अजित पवारांचे उत्तर काय?
या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "तुम्ही धादांत खोटं बोलत आहात. यामध्ये स्वतः तिथल्या (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) तीन ते चार खासदारांचं मी ऐकलं. नीलेश लंके, अमर काळे अजून एक कोणीतरी... त्यांनी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की, आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणीही संपर्क साधलेला नाही."
"ज्यांची विश्वासार्हता आहे ना, अशांची नावे घेत चला. त्यामुळे पुराव्यासहित... तुम्ही म्हणताहेत की अजित पवारांनी केला... ती लोक सांगताहेत की, तसं काही झालेलं नाही, तर मग कशा करता आरोप करायचा? त्यांचे खासदार स्वतः सांगताहेत ना. 20 ते 22 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात", असे उत्तर देत अजित पवारांनी सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा आरोप फेटाळून लावला.