मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 16:19 IST2025-12-03T16:17:46+5:302025-12-03T16:19:29+5:30
सदानंद दाते डिसेंबर 2027 पर्यंत या पदावर कार्य करतील.

मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
मुंबई : वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येत्या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. राज्याच्या गृह विभागाने सात अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती, त्यात दाते यांचे नाव प्रमुख्याने चर्चेत होते. आता अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. दातेंचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत असेल.
कोण आहेत सदानंद दाते?
सदानंद दाते 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून दाते ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलिस, एसपी नवी मुंबई आदी पदावर काम केले आहे. सध्या ते एनआयएचे महासंचालक असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ब्लॅक कॅट’ कमांडोनी विविध ऑपरेशन्स यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
26/11 हल्ल्यात महत्वाची भूमिका
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दाते तेव्हा मुंबई क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत होते. दोन दहशतवादी मुंबईच्या कामा रुग्णालयात घुसले, तेव्हा दाते यांनी काही पोलिसांसह त्यांचा सामना केला. त्यांच्या सतर्कतेमुळेच कामा रुग्णालयातून ओलिसांना सुरक्षितपणे पळून जाता आले. त्यावेळी दाते यांना दहशतवाद्यांच्या गोळ्या लागल्या होत्या. आता त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.