प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 21:02 IST2025-09-27T20:58:03+5:302025-09-27T21:02:12+5:30
CM Relief Fund News: 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
CM Fund News: मराठवाड्यात गेल्या दहा दिवसातील पावसामुळे तब्बल ८६ जणांचा पुरात वाहून जीव गेला, तर १७२५ जनावरे दगावली. तीन जिल्ह्यांत अद्याप पंचनाम्यांना वेग आलेला नाही. पूर ओसरल्यानंतर शेतशिवारातून काही पिके वाचविता येतात का? किंवा बुडालेल्या घरातून काही वस्तू मिळतात का याचा शोध लोक घेत आहेत. मराठवाड्यात १६५ मिमी पाऊस जास्तीचा झाला असून, हे प्रमाण १२४ टक्के एवढे आहे. गेल्या वर्षी ७९४ मिमी पाऊस झाला होता. १२० टक्के हे प्रमाण होते. परभणी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने झालेले नुकसान पाहता शेतकरी त्रस्त झाले आहेत. असे असताना पुन्हा शुक्रवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यातच शेतकरी बांधव, पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदतीचा हात देण्यात येत आहे. अजित पवार गटाचे सर्व आमदार-खासदार, शिंदेसेनेचे सर्व मंत्री, आमदार तसेच भाजपचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत. तसेच दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचा राजपत्रित अधिकारी महासंघाचा निर्णय समोर आला आहेत. तसेच बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याचा मनोदय व्यक्त केला. समाजाच्या विविध स्तरांतून मदतीसाठी लोक पुढे येत आहेत. यातच एका सामान्य विक्रेत्याने पुढे येऊन पूरग्रस्त आणि शेतकरी बांधवांसाठी तब्बल एक लाखांची मदत केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान
सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दान! पुण्यातील भाजी विक्रेते चरण वणवे यांनी आज 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी तब्बल ₹१,१३,७२४ देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आमदार हेमंत रासने उपस्थित होते. संकट काळात नागरिकांना मदत करण्यासाठी चरण वणवे आपल्या घरातील सद्गुरू शंकर महाराज यांच्या पादुकांपुढील पेटीत दररोज ₹१०० जमा करतात. कोविड काळातही त्यांनी याच संकल्प पेटीतून मोठी मदत केली होती. सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांवर मोठं संकट आले आहे. अशा वेळी मदतीचा हात पुढे करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. याच भावनेतून चरण वणवे यांनी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण प्रेरणादायी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण पूरस्थितीने मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला असून, पिकांसह माती खरडून निघाल्याने शेतशिवारांना नदीचे स्वरूप आले आहे. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली जिल्ह्यांत पाऊस झाला. अनेक भागांत पूर असल्याने नुकसानग्रस्त शिवारांचे पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत.
सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दान!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 27, 2025
पुण्यातील भाजी विक्रेते चरण वणवे यांनी आज 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी तब्बल ₹1,13,724 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आमदार हेमंत रासने उपस्थित होते. संकट काळात नागरिकांना मदत करण्यासाठी चरण वणवे आपल्या घरातील सद्गुरू शंकर महाराज… pic.twitter.com/zIAZvuMyYA