'महाराष्ट्रात होणार भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ', मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:12 IST2025-01-24T18:10:51+5:302025-01-24T18:12:27+5:30

कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

'India's first artificial intelligence university to be set up in Maharashtra', Minister Ashish Shelar announces | 'महाराष्ट्रात होणार भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ', मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

'महाराष्ट्रात होणार भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ', मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

Artificial Intelligence university: जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यावर भर दिला जात असून, आता महाराष्ट्र सरकारनेही या संदर्भाने महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी (२३ जानेवारी) जाहीर केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जागतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले की, "कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. तंत्रज्ञान विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योग आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणारे हे विद्यापीठ असेल", असे शेलार यांनी सांगितले.   

जागतिक बदलांच्या दृष्टीने भारतीय तरुणांना तयार करेल

"महायुती सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे, हे विद्यापीठ अत्याधुनिक संशोधन आणि कौशल्य विकासासाठी केंद्रस्थानी राहील. इतकेच नाही तर हे विद्यापीठ भारतीय तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत आणि बदलांचं नेतृत्व करण्यासाठी तयार करेल," असे मंत्री आशिष शेलार म्हणाले. 

"सरकार लवकरच देशातील पहिले राज्यस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर धोरण जाहीर करणार असून, यासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे", अशी माहिती शेलार यांनी यावेळी दिली.  

"आमचे सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नवसंकल्पनांच्या संधी निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणात परिवर्तन घडवून, भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी कटिबद्ध आहे", असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. 

Web Title: 'India's first artificial intelligence university to be set up in Maharashtra', Minister Ashish Shelar announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.