शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 06:35 IST2025-11-15T06:35:18+5:302025-11-15T06:35:42+5:30

Ram Sutar News: राम सुतार यांना शुक्रवारी राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (२०२४) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

India's fame worldwide through sculptor Ram Sutar, praise from Chief Minister Devendra Fadnavis | शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार

शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार

नवी दिल्ली : विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून, त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.

राम सुतार यांना शुक्रवारी राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (२०२४) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नोएडा (उत्तर प्रदेश) येथील सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, खासदार महेश शर्मा, ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, ‘महाराष्ट्र सदना’च्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आणि अनिल सुतार आदी उपस्थित होते.

शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सुतार यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सुतार यांनी घडविलेली शिल्पे अतिशय परिपूर्ण असून जगभरात ती दिमाखात उभी आहेत.  सुतार यांच्या मनात महाराष्ट्र असून त्याची प्रचिती पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या जयघोषातून आली. सुतार यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की सुतार यांनी केवळ देशातच नव्हे तर जगभर शिल्पे उभारली आहेत. देशाचे स्टॅच्युमॅन अशी त्यांची ओळख असून अनेक उंच पुतळे उभारणाऱ्या सुतार यांच्यामुळे पुरस्काराचीच उंची वाढली आहे. ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले सुतार हे मराठी माणसाचा मानबिंदू आहेत.

सुतार यांचे शिल्पकला क्षेत्रात अतुलनीय योगदान
महाराष्ट्र आणि देशाने सुतार यांच्या श्रेष्ठ कलेची अनुभूती घेतली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की सुतार हे महाराष्ट्राचा अभिमान असून त्यांचे या क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्मिलेला पुतळा इंदू मिल येथील स्मारकामध्ये उभारण्यात येणार आहे.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका विशद करून सुतार यांनी कलेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. अनिल सुतार यांनी या सन्मानाबद्दल सरकारचे आभार मानले.
फडणवीस यांनी सुतार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याप्रसंगी स्वाती सुतार, सोनाली सुतार, समीर सुतार, दिवाकर शर्मा, कुलदीप मित्तल यांसह विविध अधिकारी आणि सुतार कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

Web Title : मूर्तिकार राम सुतार सम्मानित, मुख्यमंत्री फडणवीस ने की सराहना

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने मूर्तिकार राम सुतार को उनकी कला के माध्यम से भारत की वैश्विक प्रतिष्ठा बढ़ाने के लिए सराहा। सुतार को महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिला। उनकी मूर्तियां महाराष्ट्र की भावना का प्रतीक हैं, जिससे पुरस्कार का महत्व बढ़ा।

Web Title : Sculptor Ram Sutar Honored, Celebrated by Maharashtra Chief Minister Fadnavis

Web Summary : Chief Minister Fadnavis lauded sculptor Ram Sutar for elevating India's global reputation through his timeless sculptures. Sutar received the Maharashtra Bhushan award, with dignitaries present. His sculptures embody Maharashtra's spirit, enhancing the award's prestige, officials stated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.