"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:00 IST2025-05-10T16:59:18+5:302025-05-10T17:00:09+5:30
BJP vs Sharad Pawar BCP, Politics over India Pakistan Conflict: भाजपा मिडियाकडून एक पोस्ट करण्यात आल्याने विरोधक संतापले

"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
BJP vs Sharad Pawar BCP, Politics over India Pakistan Conflict: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. त्यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच, सुमारे १०० दहशतवादीही मारले गेले. इतका मोठा धक्का देऊनही पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. गेले २ दिवस अंधार पडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या सीमेलगतच्या भागांना लक्ष्य केले जात आहे. भारताकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकत्रितपणे देशासाठी ठाम उभे आहेत. अशातच भाजपाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे शरद पवार गटाकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर किंवा देशात जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पण काँग्रेसच्या मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केल्यानंतरही, आपल्याकडून काहीच करण्यात आले नाही, असा दावा भाजपाने केला आहे. त्यासह २०१४ ते २०२५ मधील विविध हल्ले आणि त्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिलेले प्रत्युत्तर याबद्दलची पोस्ट केली आहे. यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, @BJP4India हे जे काही करत आहे ते आपल्याला पटते आहे का? देश संकटात असताना सर्व जण पक्ष, राजकारण बाजूला ठेवून एकसंध उभे आहेत. हे भाजपला बघवत नाही का? भारतीय सैन्याचे जवान आपल्या प्राणांची बाजी लावून पाकिस्तान विरोधात लढत आहेत. अशा परिस्थितीत भाजप असे राजकारण करत असेल तर याने देशाच्या एकजुटीवर फरक तर पडेलच शिवाय सैन्याच्या मनोबलावरही परिणाम होईल. त्यामुळे आपल्या ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा," असे रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे.
मा. @PMOIndia नरेंद्र मोदी जी @BJP4India हे जे काही करत आहे ते आपल्याला पटते आहे का ? देश संकटात असताना सर्व जण पक्ष, राजकारण बाजूला ठेवून एकसंध उभे आहेत. हे भाजपला बघवत नाही का ?
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 10, 2025
भारतीय सैन्याचे जवान आपल्या प्राणांची बाजी लावून पाकिस्तान विरोधात लढत आहेत. अशा परिस्थितीत भाजप… https://t.co/3GIVHAcPp9
दरम्यान, विरोधी पक्षातील आणखीही काही नेतेमंडळींनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.