Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:00 IST2025-05-15T16:59:04+5:302025-05-15T17:00:06+5:30
Eknath Shinde On Boycott Turkey and Azerbaijan: भारतावरील हल्ल्यादरम्यान भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाडलेले ड्रोन तुर्कीने बनवण्यात आल्याचे समजताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.

Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर तुर्कीचे पाकिस्तानवरील प्रेम उघडपणे समोर आले. भारतावरील हल्ल्यादरम्यान भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाडलेले ड्रोन देखील तुर्कीने बनवण्यात आल्याचे समजताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये तुर्की आणि अझरबैजानमधून येणाऱ्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्यात आला. याशिवाय, या दोन्ही देशात जाणाऱ्या ६० टक्के भारतीय पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील व्यापारी आणि पर्यटकांच्या निर्णयाचे स्वागत केले.
भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या सीमेवरील हल्ल्यातही तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवल्याची माहिती समोर आली. भारतात याविरुद्ध प्रचंड संताप आहे आणि बहिष्कार तुर्की मोहीम तीव्र झाली. देशातील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून तुर्की सफरचंद खरेदी करणे बंद केले. याचबरोबर पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्कीला जाणारे प्रवास पॅकेजेस देखील रद्द केले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
"पुणे, राजस्थानसह अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांनी तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकला आहे. मी त्याचे स्वागत करतो कारण ते देशभक्ती दर्शवतात. तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला, ज्याने आपल्या निष्पाप नागरिकांना मारले आहे. त्यामुळे तुर्कीवर पूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात मोठे नुकसान होण्याची शक्यता
भारताने टाकलेल्या बहिष्कारामुळे तुर्की आणि अझरबैजान यांना पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पुण्यात तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यात आला, ज्यामुळे मागणीत ५० टक्के घट झाली. हिमाचल, उत्तराखंड आणि इराणमधून सफरचंद खरेदी केले जात आहेत. यामुळे तुर्कीला कोट्यावधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.