इंडिया आघाडीला निमंत्रकाची गरज नाही, मुंबईतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 19:44 IST2023-09-01T19:43:59+5:302023-09-01T19:44:49+5:30
आज मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाली, यात 13 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीला निमंत्रकाची गरज नाही, मुंबईतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
India alliance meeting mumbai: आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक पार पडली. यै बैठकीत आघाडीचा प्रमुख निमंत्रक(संयोजक/समन्वयक) ठरवला जाईल, अशी अपेक्षा होती. पण, याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. बैठकीनंतर शिवसेना (UBT) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठी माहिती दिली.
मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंना आघाडीच्या संयोजकाबाबत विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, सध्या आमच्या इंडिया आघाडीला कुठल्याही समन्वयकाची विशेष गरज नाही. आम्ही परस्पर सहमतीने 13 सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य आघाडी आणि जागावाटपाबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
या समन्वय समितीमध्ये काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, राष्ट्रवादीचे शरद पवार, द्रमुकचे एमके स्टॅलिन, शिवसेनेचे संजय राऊत, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चड्ढा, सपाकडून जावेद खान, जेडीयूचे लल्लन सिंह, जेएमएम चे हेमंत सोरेन, डी राजा, एनसीचे ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश आहे.
जागावाटपावर लवकरच चर्चा होईल
या बैठकीत 2024 ची लोकसभा निवडणूक एनडीएविरोधात एकत्र लढण्याचा ठराव घेण्यात आला आहे. मात्र, या बैठकीत आघाडीतील भागीदारांमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाले नसून, लवकरच राज्यांतील जागावाटपाबाबत चर्चा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आघाडीचा 'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया'चा नाराही देण्यात आला.