'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:14 IST2025-10-01T18:12:54+5:302025-10-01T18:14:11+5:30
Ind-Pak Asia Cup 2025 : 'एक देशभक्त म्हणून माझा त्या सामन्याला विरोध होता.'

'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
Ind-Pak Asia Cup 2025 : शिवसेना (उबाठा) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'देशद्रोह्यांनी भारत-पाकिस्तान सामना एन्जॉय केला असेल.' त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ परत पाठवणे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानची पोलखोल करण्यासारखी पाऊले उचलली आहेत. मात्र, आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचे वेळापत्रक जाहीर होताच देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त झाली. विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत सामना रद्द करण्याची मागणी केली. ठाकरे गटानेही याचा सातत्याने विरोध केला. मात्र, नियमांचा हवाला देत केंद्र सरकारने स्पर्धेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई - #LIVEhttps://t.co/MeTzZ7IHIh
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 1, 2025
या चषकातील अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवत चषकावर आपले नाव कोरले. आता यावरुन उद्धव ठाकरेंनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी तो सामना पाहिला नाही. एक देशभक्त म्हणून माझा त्या सामन्याला विरोध होता. मात्र, देशद्रोह्यांनी तो सामना एन्जॉय केला असेल,' असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे.
फडणवीस सरकारवर आरोप
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पूर आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचाही उल्लेख केला आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, 'महाराष्ट्र भीषण पुराचा सामना करत आहे. मी राज्य सरकारला हात जोडून विनंती करतो की, त्यांनी कोणत्याही राजकीय सहभागाशिवाय शेतकऱ्यांना मदत करावी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येते. ते सर्व स्वतःच्या जाहिराती आणि ब्रँडिंगमध्ये व्यस्त आहेत."
उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की, 'काही साखर कारखानदारांनी अलीकडेच त्यांच्या कर्जबाजारी गिरण्यांना वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा विमा काढला आहे. जर भाजप या राजकीय नेत्यांना संरक्षण देण्यास तयार असेल, तर आपल्या शेतकऱ्यांना का नाही? राज्य सरकार ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारते. साखर कारखानदार अतिरिक्त खर्च का उचलत नाहीत? साखर संघटनांनीही आता याचा निषेध केला आहे.'
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई - #LIVEhttps://t.co/6Y32DHniUs
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 1, 2025
शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी
'देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मला पत्र लिहून बाधित शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणि विशेष मदत पॅकेजची मागणी केली होती. त्यावेळी मी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. मुख्यमंत्री आताही असेच करतील का? केंद्रीय पथकाने पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी अद्याप बाधित भागांना भेट दिलेली नाही. शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर ५०,००० रुपयांची मदत देण्याची आमची मागणी आहे. राज्य सरकारने दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती निकषांसारख्या अटींमध्ये तडजोड करणे थांबवावे आणि नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी तातडीने मदत जाहीर करावी,' अशी मागणी त्यांनी यावेळी केली.