सव्वा दोन वर्षांपासून कोमात, उपचारांवर ४ कोटी खर्च, पण..., मुंबईतील अनिलची हरिश राणापेक्षा बिकट अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:13 IST2026-03-18T19:16:15+5:302026-03-18T20:13:18+5:30
Anil Dixit News: २०१३ मध्ये इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या आणि कोमामध्ये जाऊन गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या हरीश राणा या तरुणाला इच्छामृत्यू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. दरम्यान, हरीश राणासारखीच एक करुण कहाणी मुंबईतून समोर आली आहे. मुंबईतील आनंद दीक्षित हा तरुण एका गंभीर अपघातात गंभीर जखमी झाल्यापासून मृत्यूशी झुंज देत अंथरुणावर खिळून पडला आहे.

सव्वा दोन वर्षांपासून कोमात, उपचारांवर ४ कोटी खर्च, पण..., मुंबईतील अनिलची हरिश राणापेक्षा बिकट अवस्था
२०१३ मध्ये इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या आणि कोमामध्ये जाऊन गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या हरीश राणा या तरुणाला इच्छामृत्यू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यानंतर गाझियाबादमधील हरीश राणा याला इच्छा मृत्यू देण्याची प्रक्रिया दिल्लीतील एम्समध्ये सुरू झाली आहे. हरीश राणा याच्या जीवन आणि मृत्यूशी सुरू असलेल्या संघर्षाची करुण कहाणी ऐकून लोकांचं मन हेलावून गेली आहे. दरम्यान, हरीश राणासारखीच एक करुण कहाणी मुंबईतून समोर आली आहे. मुंबईतील आनंद दीक्षित हा तरुण एका गंभीर अपघातात गंभीर जखमी झाल्यापासून मृत्यूशी झुंज देत अंथरुणावर खिळून पडला आहे.
एका अपघातानंतर आनंद दीक्षित हा गेल्या सव्वा दोन वर्षांपासून वेजिटेटिव्ह स्टेट स्थितीमध्ये अंथरुणावर खिळून आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्तीच्या मेंदूच्या पुढील भाग काम करणं बंद करतो. त्यामुळे त्यातील जागरुकता, विचारक्षमता आणि संवाद साधण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद होते. ही स्थिती अनेक वर्षे सुरू राहते. तसेच रुग्ण एखाद्या जिवंत मृतदेहाप्रमाणे निपचित पडून राहतो. जीवन रक्षक उपकरणांद्वारे रुग्णाला जिवंत ठेवता येतं. मात्र यातून बरे होण्याची शक्यता कमी असते. मात्र अशा व्यक्तीला कायदेशीररीत्या जिवंत मानलं जातं.
आनंद दीक्षितला झालेल्या अपघाताबाबत त्याच्या आईने सांगितले की, २९ डिसेंबर २०२३ रोजी रात्री आनंद नव्याने खरेदी केलेल्या दुचाकीवरूव बाहेर फिरायला गेला होता. त्यावेळी दुचाकीला अपघात होऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून आनंद जीवन मृत्यूशी झुंज देत आहे. सध्या आनंदला ट्युबच्या माध्यमातून जेवण दिलं जातं. तसेच मशीनद्वारे श्वास दिला जात आहे.
आनंदवर उपचार सुरू असतानाच पालिकेने आपलं घर पाडलं. त्यामुळे संसार उघड्यावर आला. तसेच भाड्याच्या घरात राहायला जावं लागलं, असे आनंदच्या आईने सांगितले. तर मुलावरील उपचारांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले. त्यात विमा कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माझ्याकडे जे काही होतं ते मी विकलं. आता केवळ मुलाच्या तोंडून बाबा हे शब्द मला ऐकायचे आहेत, अशी भाबडी आशा आनंद दीक्षित याच्या वडिलांनी व्यक्त केली. तर आपला मुलगा एक ना एक दिवस बरा होईल, अशी अपेक्षा आनंदच्या आईने व्यक्त केली. मात्र मुलाच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने त्यांची चिंता वाढत आहे.