JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 09:12 IST2025-06-19T09:11:33+5:302025-06-19T09:12:47+5:30
Illegal forest land acquisition case: जे. एम. म्हात्रे यांच्या दादर, पनवेल येथील मालमत्तांवर ईडीने छापा टाकला.

JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पनवेलचे माजी नगराध्यक्ष, जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जे. एम. म्हात्रे यांच्या दादर, पनवेल येथील मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने छापा टाकला हाेता. त्यात, म्हात्रे यांच्या बँकेतील ४४ कोटींच्या शिल्लक रकमेसह ठेवी, म्युच्युअल फंड गोठविण्यात आले आहे. १६.५ लाखांची रोकड जप्त केली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, म्हात्रे यांनी २००५ मध्ये सातबारा उताऱ्यात फेरफार करून पनवेल तालुक्यातील वहाळ गावातील वन विभागाच्या अखत्यारीतील भूखंड अवैधरीत्या ताब्यात घेतला आणि त्यातील काही भाग स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय)ला विकला. तसेच मोबदला म्हणून ४२ कोटी रुपये मिळविले, असा आरोप म्हात्रे यांच्यावर आहे. या प्रकरणी वन विभागाने केलेल्या तक्रारीच्या आधारे पनवेल पोलिस ठाण्यात सप्टेंबर २०२४ मध्ये म्हात्रे आणि सय्यद मोहम्मद अब्दुल हमीद कादरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वन विभागाची जमीन बळकावली आणि विकली
१९७५ मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र खासगी वन (अधिग्रहण) कायदा, १९७५च्या तरतुदींनुसार जमीन अधिग्रहित केली होती. त्यानंतर ७/१२ उताऱ्यातील मालकाचे नाव महाराष्ट्र सरकारचा वन विभाग असे बदलण्यात आले. पुढे नोंदीमध्ये फेरफार करण्यात आला. मालकाचे नाव ‘वन विभाग, महाराष्ट्र सरकार’ हे बदलून म्हात्रेंनी आपले नाव लावले. शिवाय त्यांनी जमिनीचा तुकडा एनएचएआयला बेकायदेशीररीत्या विकला. त्यापोटी म्हात्रे यांना ४२.४ कोटी आणि कादरी यांना ९.६९ कोटी रुपये बेकायदेशीर भरपाई मिळाल्याचे तपासांतून स्पष्ट झाले. म्हात्रे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.