"शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; CM फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 21:22 IST2025-03-19T21:20:37+5:302025-03-19T21:22:21+5:30

Lokmat Maharashtrian of The Year 2025: 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२५' पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जयंत पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली. 

"If people like Sharad Pawar are the main opposition at the Centre, then the opposition is profound"; CM Fadnavis presents a strong stand | "शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; CM फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका

"शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर..."; CM फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका

Devendra Fadnavis IMOTY 2025:  देशाच्या भविष्यातील राजकारणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्दे अधोरेखित केले. शरद पवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांनी काही अपेक्षा विरोधी पक्षांकडून व्यक्त केल्या. "शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल, तर सत्तारुढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे, तोही प्रगल्भ असला पाहिजे", असे म्हणत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२५' पुरस्कार सोहळा मुंबईतील राजभवनात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. 

महाराष्ट्राची भूमिका काय असेल?

'देवेंद्रजी, भारताचं राजकारण दिवसेंदिवस बदलतंय. भारतीय राजकारणाच्या सद्यस्थितीबद्दल तुमचं मत काय आहे आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महाराष्ट्र कोणती भूमिका निभावेल, असं तुम्हाला वाटतं?', असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. 

प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बघा, काय आहे की, शेवटी आपली लोकशाही प्रगल्भ होतेय आणि साधारणपणे भारतीय राजकारणातील नवा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे लोक निर्णायक अशा पद्धतीने मतदान करताहेत. मला असं वाटतं की, ९०च्या दशकातील कल काय होता, तर आघाडी सरकारांचा होता."

भारतासमोर अभूतपूर्व संधी -फडणवीस

"आघाडीमध्ये केंद्रस्थानी जो पक्ष असायचा, तो कमकुवत असायचा आणि त्यामुळे ती आघाडी जी आहे, ती नीट बांधलेलं नसायचे आणि अनेक अडचणी यायच्या. पण, आता अशी परिस्थिती नाहीये. आता निर्णायक बहुमत मिळत आहे. संजीव बजाजजींनी सांगितलं की, अभूतपूर्व संधी भारतासमोर आहेत. ज्या प्रकारे जिओपॉलिटिक्समध्ये संधी आपल्याला मिळतेय. संधी येतेय. तंत्रज्ञानामध्ये पुढच्या टप्प्यावर आपण चाललो आहोत. अशा लोकशाहीमध्ये सक्रिय भूमिका असली पाहिजे", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विरोधकांच्या भूमिकेबद्दल फडणवीसांनी काय भाष्य केले?

"एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, ती म्हणजे लोकशाहीमध्ये चांगला विरोधक असणं. शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल, तर सत्तारुढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे, तोही प्रगल्भ असला पाहिजे", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  

पवार साहेबांसारखे प्रमुख विरोधी पक्ष असते, तर...

"अगदी सांगायचं झालं, तर जयंतराव तुम्ही आज विरोधी पक्षात आहात. तुमच्यासारखे लोक, पवार साहेबांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असते, तर कदाचित त्यात प्रगल्भता दिसली असती. पण, आज दुर्दैवाने केंद्रात विरोधी पक्षात ती प्रगल्भताच दिसत नाही आणि जर केंद्रात प्रगल्भता नसेल... म्हणजे आपली वेगवेगळी मते असू शकतात, पण त्याचा अर्थ हा नाहीये की, प्रत्येक गोष्टीला विरोधच केला पाहिजे", अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. 

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज -CM फडणवीस

"टोकाचाच विरोध केला पाहिजे. विरोध करतात करता आपण हळूहळू अशा शक्तींच्या हाती पडतोय का की, ज्या शक्तींना भारताची प्रगती नकोय. म्हणून त्या शक्ती अदृश्यपणे काम करताहेत, अशा शक्तींची मदत आपण घेतोय का? या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचा आवश्यकता आहे. आताच्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की, सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची असेल, तर जबाबदार विरोधी पक्षाची आहे", अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

Web Title: "If people like Sharad Pawar are the main opposition at the Centre, then the opposition is profound"; CM Fadnavis presents a strong stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.