आम्हाला नाही तर शिवसेनेलाही नको, रायगड जिल्हा भाजप मंत्र्याकडे द्या; NCP ची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 09:00 IST2023-07-14T08:59:16+5:302023-07-14T09:00:21+5:30
पालकमंत्रिपदावरून महायुतीत जुंपली, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री त्यांच्याकडे जाईल, अशी चर्चा सुरू झाली

आम्हाला नाही तर शिवसेनेलाही नको, रायगड जिल्हा भाजप मंत्र्याकडे द्या; NCP ची मागणी
दीपक भातुसे
मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून रायगडचे पालकमंत्रिपद चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यावरून महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. यावर तोडगा म्हणून रायगडचे पालकमंत्रिपद शिंदे गटालाही नको आणि राष्ट्रवादीलाही नको, तर भाजपने स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी अजित पवार गटाकडून केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री त्यांच्याकडे जाईल, अशी चर्चा सुरू झाली. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिती तटकरेंनी हे पद भूषवले होते. मात्र या चर्चेमुळे शिंदे गटातील महाडचे आमदार भरत गोगावले यांची अस्वस्थता वाढली. त्यातूनच त्यांनी उघडपणे रायगडचे पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, अशी मागणी केली आणि आदिती तटकरे महिला असल्याने त्यांच्यापेक्षा आपण चांगले काम करू शकू, असा अजब दावाही केला. गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर त्यांना रायगडचे पालकमंत्री करण्यास अजित पवार गटाचा तीव्र विरोध असेल. राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद द्यायचे नसेल तर ते शिंदे गटालाही देऊ नये, त्याऐवजी भाजपने रायगडचे पालकमंत्रिपद घ्यावे, अशी मागणी पवार गटाने समोर ठेवल्याचे समजते.
उदय सामंतांचे काय होणार?
सध्या उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद आहे. अजित पवार गटाकडून होणारी मागणी मान्य झाली तर सामंत यांना रायगडचे पालकमंत्रिपद गमवावे लागेल. त्याऐवजी त्यांच्याकडे दुसऱ्या जिल्ह्याची जबाबदारी द्यावी लागेल.