"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 10:40 IST2025-09-25T10:39:28+5:302025-09-25T10:40:34+5:30
Marathwada Flood Update: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल
नागपूर - मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघताच वित्तमंत्री अजित पवार यांनी संतप्त होईन पैशाचे सोंग आणता येत नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? असा सवाल वडेट्टीवर यांनी विचारला आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहेत. पण हा केवळ देखावा आहे. किती मदत देणार सांगावे असे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेलं आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवाबनवी सरकार करत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.
शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केल्यावर वित्तमंत्री अजित पवार का भडकतात? एक वर्षाआधी निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू, ही घोषणा याच पक्षांनी केली होती ना? आता पैशाचे सोंग आणता येत नाही, ही कारणे का देत आहेत? लाडक्या बहिणींचे कारण सरकार देत आहे. मग ती योजना पण मत मिळवण्यासाठी होती ना? शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, सोयाबीनवर कीड आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पीक गेले नाही तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे. यासाठी सहा महिन्यांचं आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार आहे. असं वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपले वेतन द्यावे, असे आवाहन वडेट्टीवर यांनी यावेळी केले.