Sanjay Nirupam on Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुनच आता शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
निरुपम यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते.' निरुपम यांनी सनातनला भारताची सभ्यता आणि संस्कृतीचे रक्षक असे वर्णन केले आहे.
काय म्हणाले संजय निरुपम ?
संजय निरुपम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'सनातन धर्माने हजारो वर्षांपासून भारताची सभ्यता, संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली आहे. जर सनातन नसता, तर हा देश खूप पूर्वी सौदी अरेबिया झाला असता. अशा धर्माला 'दहशतवादी' म्हणणे म्हणजे कृतघ्नता आहे. जितेंद्र आव्हाडांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांच्या स्वतःच्या पूर्वजांना सनातनच्या सावलीत आश्रय मिळाला होता,' अशी टीका निरुपम यांनी केली.
काय म्हणाले होते आव्हाड ?शनिवारी (२ ऑगस्ट) एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड म्हणाले की, 'सनातन धर्मासारखे काहीही कधीच अस्तित्वात नव्हते. ही एक विचारसरणी आहे, ज्याने भारताला उद्ध्वस्त केले. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, कोणत्याही तथाकथित सनातन धर्माचे नाही. सनातन धर्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात अडथळा आणला आणि संभाजी महाराजांची बदनामी केली. ज्योतिराव फुले यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण आणि माती फेकण्यात आली. शाहू महाराजांच्या हत्येचा कट सनातन धर्म रचत होता,' अशी वादग्रस्त टीका आव्हाड यांनी केली होती.