"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:03 IST2025-07-02T10:59:59+5:302025-07-02T11:03:46+5:30
माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती असं बावनकुळे म्हणाले.

"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
मुंबई - भाजपाच्या पक्ष संघटनेत फेरबदल झाले असून कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाली आहे. चव्हाण यांच्या निवडीनंतर मावळते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भावूक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळातील अनुभव आणि संघटनेसाठी केलेल्या कामाचा आढावा मांडला आहे. त्याशिवाय कार्यकर्त्यांची माफीही मागितली आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रात म्हटलंय की, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे या कविवर्य ना. धो. महानोरांच्या ओळीसारखी काहीशी भावनिक अवस्था माझी झाली आहे. साधारण ३५ वर्षांपूर्वी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, गावोगाव कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, तर पायीच प्रवास करणे इथपासून सुरू झालेला माझा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला. हे माझ्यासाठीच अविश्वसनीय आहे. खरोखरच मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, कधीतरी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आपण काम करू. सामान्यमधल्या असामान्य शक्तींना जागृत करणे हीच तर आपल्या पक्षाची किमया आहे असं त्यांनी म्हटलं.
आपले मनापासून आभार
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 2, 2025
प्रिय कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो,
सस्नेह नमस्कार!
कविवर्य ना. धो. महानोरांच्या ओळी आहेत,
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे !!
अशीच काहीशी भावनिक अवस्था माझी झाली आहे.
साधारण 35 वर्षांपूर्वी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना… pic.twitter.com/bVtdFhy9p2
तसेच १२ ऑगस्ट २०२२ रोजी जेव्हा मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आनंद तर होताच पण त्याहून अधिक जबाबदारीचे दडपण होते. अनेक पिढ्यांनी, अतिशय कष्टाने, रक्ताचे पाणी करून राज्यात हा पक्ष उभा केला, वाढवला आणि त्यातून माझ्यासारखे कित्येक कार्यकर्ते घडले. उत्तमरावजी पाटील, ना. स. फरांदे, गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी जे पद भूषविले, त्या पदाची जबाबदारी स्वीकारणे हे माझ्यासाठी शिवधनुष्य होते. ते शिवधनुष्य समर्थपणे पेलण्याचा मी माझ्या परीने व आपल्या साथीने प्रामाणिक प्रयत्न केला. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मी महाराष्ट्रभर अनेकवेळा प्रवास केला. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, चांद्यापासून बांद्यापर्यंत, तळागाळापर्यंत व्यक्तिशः पोहचण्याचा प्रयत्न केला. बूथवरचे सामान्य कार्यकर्ते ते राज्यातील नेते अशा सर्वांमध्ये योग्य समन्वय ठेऊन पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी प्रयत्न केले. आपण, महाराष्ट्रामध्ये संघटनपर्व यशस्वीपणे राबवत दीड कोटी सदस्यसंख्या असलेला भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला पक्ष बनवला ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे असंही बावनकुळे यांनी सांगितले.
त्याशिवाय माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आपण विचारमंथन केले, झालेल्या चुकांमधून शिकलो. मरगळ झटकून मेहनत केली आणि विधानसभा निवडणुकीत वाजत गाजत विजयश्री खेचून आणली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपा- महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. या यशाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्ते म्हणून केवळ आपल्यालाच आहे. अपयशाची निराशा आणि यशाचा आनंद असे दोन्ही शिकवणारा हा अध्यक्षपदाचा प्रवास होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे व्यक्तिमत्व देशाचे नेतृत्व करत असताना मला ही जबाबदारी मिळाली त्यासाठी मी स्वतःला खरं भाग्यवान समजतो. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पात भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला योगदान देण्याची संधी मिळाली व आता राज्याचा महसूल मंत्री म्हणून ही संधी मला मिळत आहे याचा मला सर्वाधिक आनंद आहे अशी भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
काही चुका झाल्या असतील, कुणाला रागावलो असेल तर माफी मागतो
या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतून मी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला असेल अशी आशा आहे. या संपूर्ण प्रवासात पक्षाच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व आपण सर्व कार्यकर्त्यांनी मला खंबीर साथ दिली. त्यामुळे मी हे शिवधनुष्य पेलू शकलो. या प्रवासात राज्यातील मायबाप जनतेने देखील राज्यातील प्रत्येक ठिकाणी अतिशय आपुलकीने स्वागत केले, प्रेम केले, साथ दिली. आपले हे प्रेम व साथ कायम राहील, याची मला खात्री आहे. "राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः" हे ब्रीद उराशी बाळगून मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मागील तीन दशकांपासून काम करतो आहे. आई जगदंबेच्या आशीर्वादाने माझ्या जीवात जीव असेपर्यंत याच प्रामाणिकतेने काम करत राहीन असा मी विश्वास देतो. आपल्या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार! अध्यक्ष म्हणून काम करीत असताना अनवधानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कुणाला रागावलो असेल तर मी आपणा सर्वांची मनापासून माफी मागतो असंही मावळते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.