"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:28 IST2025-11-05T19:26:44+5:302025-11-05T19:28:04+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल एक विधान केलं. शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की ते परत करतात आणि मला मुख्यमंत्री करतात असे फडणवीस म्हणाले.

"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
"त्यांना (एकनाथ शिंदे) दिलं तर सेफ असतं, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात. हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही", असे विधान मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूरमध्ये डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सोहळ्याला पूर्णवेळ राहण्याची माझी इच्छा होती. पण, मुंबईत स्टार लिंक ही इलॉन मस्क यांची कंपनी आहे आणि जगातील आयसीटीमधील (Information and Communications Technology) सगळ्यात मोठी कंपनी आहे. सगळ्यात जास्त सॅटेलाईट असलेली कंपनी आहे. ती पहिल्यांदाच भारतामध्ये गुंतवणूक करत आहे. ती गुंतवणूक त्यांनी महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यासोबत कराराचा कार्यक्रम आहे. मला जायचं आहे म्हणून मी शरद पवार आणि जाधव यांची परवानगी घेतली."
मुख्यमंत्रिपद, एकनाथ शिंदेंबद्दल फडणवीस काय बोलले?
"खरं म्हणजे कल्पना आहेच की, आमचे एकनाथराव शिंदे आणि मी आम्ही अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो. कधी ते मुख्यमंत्री असतात. कधी मी उपमुख्यमंत्री असतो, कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी... मुख्यमंत्र्यांच्या जागी ते भाषण करणार आहेत. त्यांना दिलं तर सेफ असतं, कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात. हे मला माहिती असल्यामुळे मी काही रिस्क घ्यायला मागे पुढे पाहिलेलं नाही. आज ते माझ्यानंतर भाषण करतील", असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या या मिश्कील विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
नीलम गोऱ्हे म्हणालेल्या शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना त्यांना महिलांच्या मनातील मुख्यमंत्री म्हटले होते. त्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात हे विधान केले.