राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार ? उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 20:06 IST2021-08-05T20:00:51+5:302021-08-05T20:06:24+5:30
Uday samant on College: त्या-त्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार ? उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले...
मुंबई: नुकतंच राज्यात बारावीचे निकाल लागले. आजपासून राज्यात पदवी प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. त्यानंतर पदवीचे कॉलेज कधीपासून सुरू होणार, हा सर्वांनाच प्रश्न पडलाय. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉकचा निर्णयही घेतला आहे. त्यानंतर लवकरच शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली होती. याच पार्श्वभूमीवर आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये कॉलेजेस पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत.
'काल कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल,' अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.