कुजबुज! 'त्यांना' एक रुपयाही देणार नाही, भाजपा मंत्र्याला शपथेचा पडला विसर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 06:17 IST2025-02-15T06:16:37+5:302025-02-15T06:17:13+5:30
मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष यांनी राणे यांना शपथेची जाणीव करुन द्यावी, अशी कुजबुज आहे.

कुजबुज! 'त्यांना' एक रुपयाही देणार नाही, भाजपा मंत्र्याला शपथेचा पडला विसर?
शपथेचा पडला विसर
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे हे प्रथमच मंत्री झाल्याने त्यांना मंत्रिपदाच्या शपथेचा विसर पडला आहे. अन्यथा ‘कुणाला गावाचा विकास हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा. उबाठा व मविआच्या गावात जिल्हा नियोजन समितीचा एक रुपयाही देणार नाही’, अशी भाषा त्यांनी केली नसती. मंत्रिपदाची शपथ घेताना ‘सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कुणाविषयी ममत्व अथवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन’, अशी शपथ राणे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष यांनी राणे यांना शपथेची जाणीव करुन द्यावी, अशी कुजबुज आहे.
वनखात्याला पाणी पाजणार का?
घोडबंदरमधील आदिवासी पाड्यांतील रहिवासी डबक्यातील पाणी पित असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. यावर वनखाते परवानगी देत नसल्याने जलवाहिन्यांचे काम रखडल्याचे पालिका म्हणते. पालिकेचा कारभार नगरविकासमंत्री शिंदेंच्या अखत्यारित आहे. वनखात्याची जबाबदारी भाजपचे गणेश नाईक यांच्याकडे. पाण्यावरून पालिकेने वनखात्यावर खापर फोडले.तर वनखाते परवानगी देवो अथवा न देवो जलवाहिनी टाकणारच, असे एका अभियंत्याने सांगितल्यामुळे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदेंनी वनखात्यावर निशाणा साधल्याने पालिका वनखात्याला पाणी पाजणार का, असे काही जण म्हणत आहेत.
भेटीने मिळते टीकेला बळ!
राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदा भाजपसह शिंदेसेनेला झाला. याची परतफेड विधानसभेला होईल, असे वाटत असतानाच भाजपचे सहाय्य लाभले. परंतु शिंदेसेनेकडून मनसेविरोधात उमेदवार उभे केले गेले. यात मनसेचे आ. राजू पाटील यांचा पराभव झाला. तेव्हापासून जिल्ह्यात कोणतीही घटना घडताच पाटील हे उपमुख्यमंत्री शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतात. शिंदे फडणवीस यांच्यावर नाराज आहेत, अशी चर्चा असताना पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या भेटीगाठींमुळेच पाटील यांना शिंदे पिता-पुत्रांवर टीका करायला बळ मिळत असावे, अशी कुजबुज आहे.
‘त्या’ प्रश्नांवर कधी बोलणार?
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे शुक्रवारी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे महत्त्व सांगण्यासाठी पनवेलमध्ये अवतरले होते. अनेक दिवसांपासून प्रथमच ते शहरात दिसले. पक्षाच्या सोशल मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून ते पत्रकार परिषदेत बोलत होते. परंतु, आमदारकीची दुसरी टर्म भूषविणाऱ्या डावखरे यांनी पदवीधरांसाठी ठोस कार्यक्रम आखावा. आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कंपन्या तसेच खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक सुशिक्षितांना रोजगाराविषयी ते कधी बोलतील, पदवीधरांचे आमदार म्हणून रोजगार शिबिरे कधी भरवतील, अशी कुजबुज स्थानिकांत आता सुरू झाली आहे.