मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 06:53 IST2025-09-28T06:52:19+5:302025-09-28T06:53:29+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला जाणार अशा चर्चेला जोर आलेला असताना त्यांनी स्वत:च आपण २०२९ पर्यंत राज्यात राहणार असल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
मुंबई :मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला जाणार अशा चर्चेला जोर आलेला असताना त्यांनी स्वत:च आपण २०२९ पर्यंत राज्यात राहणार असल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत फडणवीस यांनी काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती आणि शुक्रवारच्या दिल्लीभेटीत पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना फडणवीस यांनी त्यांच्यासाठी दिल्ली तूर्त तरी दूरच असल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची नियुक्ती गेले काही महिने रखडली आहे. त्यासाठी केंद्रातील काही नेत्यांची नावे चर्चेत असताना त्याला जोडून फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र, फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चेला विराम
फडणवीस यांनी व्यक्त केलेला विश्वास लक्षात घेता २०२९ मधील विधानसभेची निवडणूक महायुती त्यांच्याच नेतृत्वात लढणार असे आता म्हटले जात आहे. असाही तर्क दिला जात आहे की, फडणवीस यांच्याऐवजी अन्य बड्या नेत्याला पुढील तीन वर्षांसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाईल आणि २०२८ मध्ये फडणवीस अध्यक्ष होतील. मात्र, २०२९ पर्यंत राज्यातच राहणार असे सांगून फडणवीस यांनी ही शक्यताही नाकारली आहे.
सर्वत्र महायुती होणार नाही!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका सगळीकडेच महायुती म्हणून लढविली जाणार नाही. मुंबईमध्ये महायुती असेल; पण ठाणे महापालिकेत भाजप व शिंदेसेना स्वतंत्र लढू शकते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. सगळीकडे युती केली तर महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल किंवा महायुतीतील मते विरोधी पक्षांकडे वळू शकतील, हे लक्षात घेऊन युती करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिले जातील, असे मानले जाते.