"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:23 IST2025-09-12T16:16:18+5:302025-09-12T16:23:57+5:30

परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कार्यकर्ते परिस्थितीजन्य जो निर्णय घेतील त्याला मला मान्यता द्यावी लागेल असं त्यांनी सांगितले.

"I will gradually retire from active politics..."; Sharad Pawar's loyal leader Arunbhai Gujarathi statement | "मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

जळगाव - पक्षाच्या बैठकीला मी हजर नव्हतो, त्यामुळे मी पक्ष सोडणार अशी चर्चा आहे. चोपडा तालुक्यात कार्यकर्त्यांचा चांगला संच माझ्यासोबत आहे. अनेक वर्षे आम्ही एकमेकांसोबत काम करतोय. ३ माजी आमदार पक्ष सोडून गेले. १५ दिवसांपूर्वी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे कार्यकर्ते सोडून गेले. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असे माझे कार्यकर्ते पक्षातून जात आहेत. उर्वरित कार्यकर्त्यांचं म्हणणं मला ऐकून घ्यायचे आहे. शरद पवारांनी मला फार मोठे केले. एक चिंगारी को ज्वाला बना दिया अशी माझी पवारांविषयी भावना आहे. त्यामुळे शरद पवारांना सोडून जाणार अशी बातमी आहे परंतु त्याऐवजी मी राजकारणातून हळूहळू निवृत्त होणार असं विधान पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना अरुणभाई गुजराथी म्हणाले की, ज्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवण्याचे ठरवले असेल त्यांना मला मदत करावी लागेल. त्यावेळी मी शरद पवारांना सोडले असे बोलले जाईल. साहेबांना सोडण्याचा विषय नाही परंतु १९७४ पासून २०२४ अशी ५० वर्ष, २ पिढ्या माझ्यासोबत होते. त्यांना मदत करावी लागेल ही वस्तूस्थिती आहे. कुठल्या पक्षात जावे हे कार्यकर्त्यांनी ठरवावे. साधारणत: अजित पवारांसोबत जावे अशी बहुतांश कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काही लोक सत्तेसोबत जावे असं म्हणतात. ४ वर्ष विरोधी पक्षात राहून काही कामे होणार नाही त्यामुळे साहेबांशी निष्ठा कायम ठेवून यातून मार्ग काढावा लागणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आगामी निवडणुकीत मग महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत मी त्या कार्यकर्त्यांना मदत करेन ही वस्तूस्थिती आहे. परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कार्यकर्ते परिस्थितीजन्य जो निर्णय घेतील त्याला मला मान्यता द्यावी लागेल. राजकारण अनिश्चित असते. शिवसेना असेल, आमचा पक्ष असेल त्याचे २ भाग पडतील कुणाला माहिती होते, या अनिश्चित राजकारणातून तोडगा काढावा लागतो. एकीकडे माझी निष्ठा आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या भावना हे ऐकून योग्य तो निर्णय मी घेईन असं अरूणभाई गुजराथी यांनी सांगितले. 

शरद पवार गटाचे चोपड्यातील नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावात झालेल्या बैठकीला अरुणभाई गुजराथी यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरला. गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाची जिल्हा बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात पार पडली. या बैठकीला पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते, मात्र नेहमीच पक्षाच्या बैठकांना आवर्जून उपस्थित राहणारे अरुणभाई गुजराथी नसल्याने ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले. 

Web Title: "I will gradually retire from active politics..."; Sharad Pawar's loyal leader Arunbhai Gujarathi statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.