"दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, पण...", पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 13:55 IST2025-01-19T13:52:24+5:302025-01-19T13:55:28+5:30
Dhananjay Munde: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. आता धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

"दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, पण...", पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे यांचं मोठं विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या पाच सहा वर्षांमध्ये बऱ्याच राजकीय उलथापालथी घडल्या आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. हे सरकार अवघे ८० तास चालले होते. त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. आता अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, मात्र त्यांनी ते ऐकलं नाही, असं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात होत असलेल्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनाला आज हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला. ते म्हणाले की, २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका, असे मी अजित पवार यांना सांगितले होते. याचे सुनील तटकरे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ती शपथ घेतली, पण याची शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.