"मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण..."; जितेंद्र आव्हाड नामदेव शास्त्रींना काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:34 IST2025-01-31T15:31:28+5:302025-01-31T15:34:52+5:30
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही शास्त्रींच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली.

"मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण..."; जितेंद्र आव्हाड नामदेव शास्त्रींना काय म्हणाले?
Namdev Shastri Jitendra Awhad: "या गादीने द्वेष सोडून याच्या विरोधात भाष्य करायचं असतं. शांतता निर्माण होईल, प्रेमाचे संदेश द्यायचे असतात. त्यांच्याकडून अशा कृत्याबद्दल भाष्य करणे मला पटलेलं नाही", असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हत्या झालेल्या वंजारी समाजातील व्यक्तींची यादी वाचत आव्हाडांनी यांना न्याय मिळणार आहे का?, असा सवाल नामदेव शास्त्रींना केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावरून त्यांनी नामदेव शास्त्रींना उलट सवाल केला.
नामदेव शास्त्रींच्या विधानावर आव्हाड काय बोलले?
"नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी, हे सांगण्या इतका काही मी मोठा नाही. पण, ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की, आधी तिथे मारहाण झाली. मग जे काय... हे बोलणं योग्य नाही", अशा शब्दात आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली.
आव्हाडांनी हत्या, जीवघेणे हल्ले झालेल्यांची वाचली यादी
"भगवान गडाच्या गादीची एक परंपरा आहे. या गादीचे मठाधिपती होते, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक होते. आता मी नामदेव शास्त्रींना विचारतो, गेल्या काही वर्षामध्ये खून झाले त्यांची नावे ऐका. संगीत दिघोळे वंजारी, काकासाहेब गर्जे वंजारी, महादेव मुंडे वंजारी, बापू आंधळे वंजारी, बंडू मुंडे वंजारी... ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले. महादेव गीते वंजारी, सहदेव सातभाई वंजारी, राजाभाऊ नेहरकर वंजारी... खूनात अडकवून ज्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला गेला, शिवराज बांगर, बबनभाऊ गीते वंजारी, रामकृष्ण बांगर-विजय सिंह बांगर वंजारी, प्रकाश मुंडे वंजारी, राजाभाऊ फड वंजारी... यांना न्याय मिळणार आहे का?", असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्री यांना केला.
मला ते पटलेलं नाही -जितेंद्र आव्हाड
"आपण कसलं समर्थक करतोय? खून कोणी केलाय, मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही. पण, ते निर्दोष आहेत का, नाही. या गँगला पोसण्याचं, मोठं करण्याचं काम त्यांनी कळत न कळत केलंय ना. या गादीने द्वेष सोडून याच्या विरोधात भाष्य करायचं असतं. शांतता निर्माण होईल, प्रेमाचे संदेश द्यायचे असतात. त्यांच्याकडून अशा कृत्याबद्दल भाष्य करणे मला पटलेलं नाही", असे म्हणत आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली.
"ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहेत. पण, आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असे माझे मत आहे. त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे", असेही आव्हाड म्हणाले.
धनंजय मुंडेंची भूमिका
दरम्यान, नामदेश शास्त्रींची भेट घेतल्यानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणालेले की, "भूमिका स्वतःहून मांडल्यानंतर काही जण राजकारण करत असतील, तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे की, स्व. संतोष देशमुखला खऱ्या अर्थाने न्याय देऊन, ज्यांनी कुणी अशी निर्घृण हत्या केली, त्यांना फासावर लटकावणं महत्त्वाचं आहे. माझा राजीनामा घेऊन एका समाजाला, मला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. माझं सरळ म्हणणं आहे की, यात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकावलं पाहिजे", असे धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्रींच्या भेटीनंतर म्हटलेले आहे."