"दोन्ही हात वर करून सांगतो..."; रितेश देशमुख यांचे भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना एका वाक्यात उत्तर
By संतोष कनमुसे | Updated: January 6, 2026 11:13 IST2026-01-06T11:11:07+5:302026-01-06T11:13:23+5:30
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. काल लातूरमध्ये भाजपाची सभा झाली, यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत मोठे विधान केले.

"दोन्ही हात वर करून सांगतो..."; रितेश देशमुख यांचे भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना एका वाक्यात उत्तर
राज्यात २९ महापालिकांची निवडणूक सुरू आहे. मतदान ९ दिवसांवर येऊन ठेपली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, राज्यभरात प्रचार सभा सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल (सोमवारी) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत मोठे विधान केले. "लातुरमधील विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील", असे विधान केले. या विधानामुळे आता राज्यात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेत्यांनी या विधानाचा निषेध केला आहे. दरम्यान, आता अभिनेता रितेश देशमुख यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली.
निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले...
अभिनेता रितेश देशमुख यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी कुठेही चव्हाण यांचे नाव न घेता टोला लगावला.
"दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नाव मनावर कोरलेले असतात. लिहिलेले पुसता येतं कोरलेलं नाही, जय महाराष्ट्र", असे रितेश देशमुख यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आठवणी लिहित, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान काय होते?
लातूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. काल भाजपाची बैठक होती, या बैठकीत भाषणावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक विधान केले आहे. "सर्वांनी दोन्ही हात ऊंच करून घोषणा द्यायची आहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतेय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही” असे विधान चव्हाण यांनी केले. या विधानाची राज्यात सुरू आहे.