राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल वाटलं नव्हतं! देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जींना सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 09:11 IST2026-01-29T08:53:24+5:302026-01-29T09:11:18+5:30

अजित पवारांच्या निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय वादावर मुख्यमंत्री संतापले.

I never thought politics would descend to such a low level! Devendra Fadnavis gave harsh words to Mamata Banerjee | राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल वाटलं नव्हतं! देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जींना सुनावले खडे बोल

राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल वाटलं नव्हतं! देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जींना सुनावले खडे बोल

Ajit Pawar Died in Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरलेला असतानाच आता या अपघाताभोवती राजकारणाचे वर्तुळ फिरू लागले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातात घातपाताचा संशय व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका करत, त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते, अशा शब्दांत ममता दीदींना सुनावले आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने  दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अजित पवार यांचे VT-SSK हे विमान प्रचारासाठी बारामतीकडे झेपावले होते. सकाळी ८:१८ वाजता विमानाचा बारामती एटीसीशी पहिला संपर्क झाला. पुणे अप्रोच कंट्रोलने वैमानिकाला हवामानाचा अंदाज घेऊन लँडिंगचा सल्ला दिला होता. धावपट्टीवर उतरण्यापूर्वी वैमानिकाने दोनवेळा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात दृश्यमानता कमी असल्याने धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती, परिणामी वैमानिकाने गो-अराउंड करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी दिसल्याचे वैमानिकाने कळवले, मात्र ८:४३ ला लँडिंगची परवानगी मिळाल्यावर वैमानिकाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. अवघ्या एका मिनिटात, म्हणजे ८:४४ वाजता, रनवे ११ च्या सुरुवातीलाच विमानाने पेट घेतल्याचे एटीसीच्या निदर्शनास आले. या भीषण आगीत अजित पवारांसह विमानात असलेल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

ममता बॅनर्जींचा खळबळजनक दावा

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, "अजित पवार यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे, मात्र या घटनेत काहीतरी काळबेरं असून याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी." त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी झापले

"एका भीषण अपघातात आपले प्राण गमावलेल्या नेत्याच्या निधनावरही अशा प्रकारची नीच राजकारण केली जाणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. खुद्द शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ही एक दुर्घटना होती आणि यात दुर्दैवाने लोकांचा बळी गेला आहे; त्यामुळे या विषयावर राजकारण होता कामा नये. असे असूनही, सुरू असलेली ही चर्चा अत्यंत वेदनादायक आहे. राजकारण इतक्या खालच्या स्तराला पोहोचले आहे, जिथे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवरही घाणेरडे आणि घृणास्पद राजकारण केले जात आहे, याचे मला खोलवर दुःख वाटते. ममता दीदींनी अशा प्रकारचे विधान करणे हे अत्यंत दुर्दैवी आणि पूर्णपणे चुकीचे आहे. केवळ राजकारण करण्यासाठी त्या इतक्या खालच्या थराला उतरत आहेत, हे पाहून खूप वाईट वाटते," असे फडणवीस यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले.

"अजित पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय नेते होते. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या मृत्यूला राजकीय रंग देणे, हे केवळ असंवेदनशीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखे आहे. अशा प्रकारची विधाने समाजात चुकीचा संदेश देतात आणि दुःखाच्या या प्रसंगी लोकांच्या भावना दुखावतात. मी ममता बॅनर्जींना आवाहन करतो की, त्यांनी आपल्या विधानाचा फेरविचार करावा आणि अशा टिप्पण्या करणे टाळावे," असेही अजित पवार म्हणाले.

दुसरीकडे, स्वतः शरद पवार यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे जनतेला आणि राजकीय नेत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. "हा एक दुर्दैवी अपघात आहे, यात कोणतेही राजकारण आणू नका. महाराष्ट्राने एक खंबीर नेतृत्व गमावले आहे, अशा वेळी चुकीचे दावे करून संभ्रम निर्माण करू नका," असे भावनिक आवाहन पवार यांनी केले आहे.

Web Title : अजित पवार की मौत पर फडणवीस ने बनर्जी को फटकारा, साजिश के दावे

Web Summary : अजित पवार के विमान हादसे में साजिश के दावे पर फडणवीस ने ममता बनर्जी की आलोचना की। उन्होंने इस त्रासदी का राजनीतिकरण करने की निंदा की और उनके बयानों को असंवेदनशील बताया। पवार ने संयम बरतने का आग्रह किया।

Web Title : Fadnavis slams Banerjee over Ajit Pawar's death conspiracy claims.

Web Summary : Fadnavis criticized Mamata Banerjee for suggesting foul play in Ajit Pawar's plane crash. He condemned politicizing the tragedy, calling her remarks insensitive and unfortunate. Pawar urged restraint.