अशोक चव्हाणांची कुठे मदत घ्यायचीय हे मला चांगले माहिती; राज्यसभा उमेदवारीवर फडणवीसांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 13:51 IST2024-02-13T13:51:39+5:302024-02-13T13:51:58+5:30
अशोक चव्हाणांना राज्यसभेचे उमेदवार बनविणार का, या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले.

अशोक चव्हाणांची कुठे मदत घ्यायचीय हे मला चांगले माहिती; राज्यसभा उमेदवारीवर फडणवीसांचे उत्तर
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपात प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार होता. परंतु, त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांची कुठे मदत घ्यायची हे मला चांगले माहिती आहे, असे सांगितले.
अशोक चव्हाणांना राज्यसभेचे उमेदवार बनविणार का, या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. भाजपाचे केंद्रीय नेते राज्यसभेचे उमेदवार ठरवितात. येत्या काही दिवसांत त्यांची यादी येईल तेव्हा तुम्हाला समजेल असे फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांना प्रशासकीय आणि राजकीय अनुभव आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल असे, फडणवीस म्हणाले.
आम्ही कोणते टार्गेट घेऊन चालत नाही. काही नेते असे आहेत जे आम्हाला वाटते की ते आमच्यासोबत येऊ शकतात. अजून काही नेते आमच्या चर्चेत आहेत. मी असे म्हणणार नाही की १४ -१५ आमदार येतील, परंतु जमिनीशी जोडले गेलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचे आम्ही स्वागत करू, असे फडणवीस म्हणाले. नाना पटोले हे एका ठिकाणी टिकत नाहीत. यामुळे त्यांना काही फार सिरिअसली घेऊ नका, असेही फडणवीस म्हणाले.
अशोक चव्हाण यांचा भाजपातील भुमिका काय असेल हे केंद्रीय भाजपा ठरवेल. त्यांची जी प्रतिमा आहे ती राष्ट्रीय स्तरावरील आहे. यामुळे केंद्रात निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले. एवढ्या वर्षांची पुण्याई सोडून हे लोक आमच्यासोबत का येतायत, कारण काँग्रेसला घर सांभाळता येत नाहीय. भाजपाला विरोध करता करता ते आता देशाच्या विकासाला विरोध करू लागले आहेत. यामुळे त्यांना नेते का सांभाळता येत नाहीत याचे आत्मचिंतन करावे, असे फडणवीस म्हणाले.