"छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण..."; मुलाचा व्हिडीओ बघून जयंत पाटलांची भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:54 IST2025-02-18T10:51:18+5:302025-02-18T10:54:30+5:30
Jayant Patil News: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित छावा चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

"छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण..."; मुलाचा व्हिडीओ बघून जयंत पाटलांची भावूक पोस्ट
Jayat Patil post on chhava Movie: छावा चित्रपट बघून प्रेक्षक रडत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. यात एका लहान मुलाचा व्हिडीओही खूपच व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. 'छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय याचे समाधान वाटतेय', असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असलेला हा चित्रपट बघून अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. चित्रपट बघून प्रेक्षक भारावून जाताना दिसताहेत.
छावा चित्रपट बघितल्यानंतर एक ५-६ वर्षांचा चिमुकला रडताना दिसत आहे. अश्रूंना वाट करून देतच तो 'महाराsssssज गडपती... गजअश्वपती...भूपती... प्रजापती... सुवर्णरत्नश्रीपती... अष्टवधानजागृत... अष्टप्रधानवेष्टित... न्यायालंकारमंडित... शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत... राजनितिधुरंधर... प्रौढप्रतापपुरंदर... क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो', असे म्हणत आहे.
लहान मुलाचा व्हिडीओ, जयंत पाटील काय म्हणाले?
या मुलाचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "या दाटलेल्या भावना, अश्रू भरल्या डोळ्यांच्या कडा आणि इतक्या लहान वयातील संवेदनशीलता पाहून मन भरून आले. छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय याचे समाधान वाटतेय", अशी भावूक पोस्ट जयंत पाटील केली आहे.
विकी कौशलने शेअर केला होता व्हिडीओ
या चिमुकल्याचा व्हिडीओ छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलनेही शेअर केला होता.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत विकी कौशलने म्हटले होते की, 'आमची सर्वात मोठी कमाई! बाळा, तुझा अभिमान वाटतो. तुला मिठी मारावी वाटतीये. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि भावनांबद्दल खूप खूप आभार. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरात शंभूराजांची कहाणी पोहोचावी, ही आमची इच्छा होती. हे सत्यात उतरताना पाहून जिंकल्यासारखं वाटतंय", असे विकी कौशल म्हणाला होता.