“रात्री १२ वाजता बाहेर पडतो अन्...”; खुद्द CM देवेंद्र फडणवीस यांनीच केला मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:51 IST2026-01-09T10:50:43+5:302026-01-09T10:51:23+5:30
आता स्वत: फडणवीस यांनीच एक गौप्यस्फोट केला आहे. नवीनच पैलू उलगडला आहे.

“रात्री १२ वाजता बाहेर पडतो अन्...”; खुद्द CM देवेंद्र फडणवीस यांनीच केला मोठा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस हे रात्रीबेरात्री वेशांतर करून बाहेर पडत असत आणि एकनाथ शिंदे यांना भेटायला जात असत असा एक गौप्यस्फोट खुद्द अमृता फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी केला होता. फडणवीस-शिंदेंच्या अशा भेटीतच मग २०२२ मधील सत्तांतराची बीजे रोवली गेली होती म्हणतात. ‘देवेंद्र हे हुडी घालून आणि मोठा चष्मा लावून सागर बंगल्याच्या बाहेर पडत. मलासुद्धा ते ओळखायला नाही यायचे’ असेही अमृता यांनी म्हटले होते.
आता स्वत: फडणवीस यांनीच एक गौप्यस्फोट केला आहे. तो म्हणजे ते रात्री १२ नंतर वर्षा बंगल्याबाहेर पडतात, स्वत: ड्रायव्हिंग करत कधी ठाणे तर कधी पनवेलपर्यंत फेरफटका मारून येतात. ड्रायव्हिंग हे त्यांचे पॅशन आहे, ड्रायव्हिंग करायला त्यांना फारच आवडते. दिवसा ते ड्रायव्हिंग करू शकत नाहीत, म्हणून रात्री बाहेर पडतात’ असे सांगून त्यांनी नवीनच पैलू उलगडला आहे.
‘माझ्यासोबत सिक्युरिटी नसते, एखादा मित्र असतो. कधीकधी पोलिस गाडी थांबवतात, ड्रायव्हर दारू पिऊन तर चालवत नाही ना याची खातरजमा करण्यासाठी ब्रेथ ॲनालायजर समोर करतात, एकदम मी त्यांना दिसतो आणि त्यांना प्रश्न पडतो की अरे! हे इथे कसे काय? अशी गंमतही त्यांनी सांगितली. एक काळ आठवला, फडणवीस तेव्हा नागपुरात बुलेट चालवायचे, मित्र, कार्यकर्तेही ती फिरवायचे; मग कमांडर जीप आली, ड्रायव्हिंगची पॅशन तेव्हापासून आहे.