Chhagan Bhujabl News: 'ढोंगी आणि बकवास लेकाचे', अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (२० मे) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राऊतांनी एक खरमरीत पोस्ट लिहून भाजपवर निशाणा साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये छगन भुजबळांना स्थान दिलं गेलं नव्हतं. नाशिकमधून माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यामुळे भुजबळ नाराजही झाले. पण, धनंजय मुंडेंचा राजानीमा पडला आणि भुजबळांची प्रतिक्षा संपली. त्यानंतर मंगळवारी (२० मे) सकाळी भुजबळांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली.
संजय राऊत म्हणाले, 'नकली चाणक्य यांची लेवल जनतेला समजली'
छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांनी भुजबळ मंत्री झाल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत राऊतांनी भाजपला लक्ष्य केलं.
वाचा >>केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
"छगन भुजबळ फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सन्मानीय मंत्री झाले, याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. यामुळे संपूर्ण भाजपा, महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची लेवल जनतेला समजली. मुलुंडचा नागडा पोपटलाल तर बेवा झाला! ढोंगी आणि बकवास लेकाचे!", अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागले.
भुजबळांवर भाजपनेच केले होते आरोप
२०१४ आणि त्यानंतरही भाजपच्या मंत्र्यांनी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना तुरुंगातही राहावे लागले होते.
याच मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर भाजपवर टीका होत आहे.
ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांनी पक्षांतर केले आणि भाजपकडून आरोप करणे थांबल्याचेही दिसत आहे. त्यावरूनच आता सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. छगन भुजबळांविरोधात गंभीर आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर याच मुद्द्यावरून टीका केली आहे.