हुश्श! मान्सूनची मुंबई, कोकणातून माघार; चला 'हुडहुडी'च्या तयारीला लागा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:26 IST2025-10-11T09:25:30+5:302025-10-11T09:26:20+5:30
आता मान्सूनच्या परतीची सीमा अलिबाग, अकोला, जबलपूर, वाराणसीतून जात आहे. राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील तीन ते चार दिवसांत माघारी जाणार असल्याची माहिती ‘सतर्क’ने जारी केली आहे.

हुश्श! मान्सूनची मुंबई, कोकणातून माघार; चला 'हुडहुडी'च्या तयारीला लागा...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जून ते सप्टेंबरदरम्यान कमी वेळात जास्त पडून मुंबईची तुंबई करणाऱ्या मान्सूनने शुक्रवारी मुंबापुरीतून माघार घेतली. याबाबतची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली.
‘सतर्क’कडील सविस्तर माहितीनुसार, मान्सून शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकणसह अन्य भागातून मान्सून माघारी फिरला आहे. आता मान्सूनच्या परतीची सीमा अलिबाग, अकोला, जबलपूर, वाराणसीतून जात आहे. राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील तीन ते चार दिवसांत माघारी जाणार असल्याची माहिती ‘सतर्क’ने जारी केली आहे.
दिवाळीत पाऊस पडेल की नाही? याचे संकेत पुढील आठवड्यात मिळतील, तर मान्सूनने माघार घेतली असतानाच शुक्रवारी दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईतील परिसर अंधूक झाल्याचे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.
धुळीमुळे हवामान अंधूक
समुद्राहून जमिनीकडे म्हणजे मुंबईकडे वाहणारे वारे थांबले आहेत. वाऱ्याची दिशा बदलली आहे. उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेकडून खाली मुंबईकडे संथ गतीने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा वेग कमी असतानाच हवेतील धूळ, मातीचे हलके कण हवेत तरंगू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून हवामान अंधूक असून, येथील हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची असल्याचेही हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.