how can i say that i was Deliberately defeated asks bjp leader pankaja munde | पराभव झाला की घडवून आणला गेला?; पंकजा मुंडे म्हणाल्या...

पराभव झाला की घडवून आणला गेला?; पंकजा मुंडे म्हणाल्या...

बीड: भाजपा नेत्या पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव घडवून आणण्यात आला, असा स्पष्ट आरोप एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. आपण आरोपांचे पुरावे देऊ असं म्हणत त्यांनी थेट माजी मंत्री गिरीश महाजन यांनादेखील आव्हान दिलं होतं. या संपूर्ण आरोप प्रत्यारोपांवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी अतिशय सूचक विधानं करत पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वावर टीका केली. 

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात माझा पराभव झाला. मात्र हा पराभव मी केवळ पाच मिनिटांमध्ये स्वीकारला. मी दिग्गज नेत्यांना पाहात लहानाची मोठी झाले आहे. त्यामुळे मी लगेच पराभव पचवू शकले, असं पंकजा म्हणाल्या. तुमचा पराभव झाला की घडवून आणला गेला, या प्रश्नाला त्यांनी अतिशय सावधपणे उत्तर दिलं. माझा पराभव घडवून आणला, असं कसं म्हणता येईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या काळात मी पक्षासाठी अतिशय समर्पित भावनेनं काम केलं. शेवटपर्यंत मी इतर मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेत होते, असंदेखील त्यांनी सांगितलं. 

यशामध्ये भागीदार होता, तर पराभवाचीदेखील जबाबदारी घ्यायला हवी. आमचं चुकलं हे मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला हवा, अशा सूचक शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य केलं. पंकजा उद्या गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन समर्थकांना संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपापासून काहीशा दूर गेलेल्या पंकजा मुंडे उद्या नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

गोपीनाथ गडावरील मेळाव्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगत पक्षाच्या राज्यातील नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'गोपीनाथ मुंडेंना एखाद्याला जवळ करायचं असेल, तर त्यामुळे दूर जाऊ शकणाऱ्या व्यक्तीला ते आधी जवळ करायचे. अशाच प्रकारे त्यांनी माणसं जपली,' असं मुंडे म्हणाल्या.

भाजपा सोडणार याबद्दलच्या वावड्या कुठून उठवण्यात आल्या, याबद्दल मला कल्पना नाही. नाराज हा शब्दच मला आवडत नाही. मी कोणावर नाराज होऊ, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षाकडून पद मिळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्या जात असल्याच्या दाव्यांचा त्यांनी पूर्णपणे इन्कार केला. मी ज्यांच्याकडे काही मागावं, अशी कोणतीही मोठी व्यक्ती माझ्या आजूबाजूला नाही. सध्या जे कोणी आजूबाजूला आहेत, त्यांच्यासोबत मी बरोबरीनं काम केलं आहे, असंदेखील त्या म्हणाल्या.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: how can i say that i was Deliberately defeated asks bjp leader pankaja munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.