दाभोलकर हत्या तपासावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

By Admin | Updated: September 3, 2015 01:56 IST2015-09-03T01:56:44+5:302015-09-03T01:56:44+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यात अपयशी ठरलेल्या सीबीआयला

High court grilling over Dabholkar murder probe | दाभोलकर हत्या तपासावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

दाभोलकर हत्या तपासावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यात अपयशी ठरलेल्या सीबीआयला व राज्य शासनाला बुधवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले़ या तपासावर न्यायालयाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करीत न्यायालयाने तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेशही सीबीआयला दिले़
डॉ़ दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नसल्याने त्यांची मुलगी मुक्ता व मुलगा
हमीद यांनी याचिका दाखल केली
आहे़ तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी करणारी याचिका पानसरे यांची मुलगी स्मिता व सून मेघा यांनी केली आहे़ न्या़ रणजित मोरे व न्या़ राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली़ डॉ़ दाभोलकर यांची हत्या आॅगस्ट २०१३ मध्ये झाली़ २०१४ मध्ये याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला़ डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाली तरी तपास यंत्रणेच्या हाती मारेकरी लागलेले नाहीत़ राज्य शासनानेही सीबीआयच्या मदतीसाठी राज्य पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे़ यात साहाय्यक पोलीस आयुक्त, चार पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उप निरीक्षक आहेत़ हे अधिकारी नागपूर व यवतमाळ येथील आहेत़ सीबीआय व या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दोभोलकर भावंडांचे वकील अ‍ॅड़ अभय नेवगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर संतप्त होऊन न्यायालय म्हणाले, दाभोलकर यांची हत्या दोन वर्षांपूर्वी झाली़ अद्याप त्यांचे मारेकरी सापडले नाहीत़ शिवाय राज्य शासनाने सीबीआयच्या मदतीसाठी दिलेले अधिकारी नागपूर व यवतमाळ येथील आहेत, ही बाब दुर्देवी आहे़ हे पोलीस अधिकार पुणे येथीलच असायला हवे होते़ पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती का केली नाही? याचे प्रत्युत्तर शासनाने सादर करावे़ तसेच या तपासाचा सद्यस्थितीचा अहवाल सीबीआयने सादर करावा, असे आदेश खंडपीठाने दिले़ (प्रतिनिधी)

‘अघोरी’ दावा करणाऱ्या
साध्वीला हल्ल्याची भीती
नाशिक: अघोरी विद्येच्या आधारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा तपास लावण्याचा दावा करणाऱ्या साध्वी शिवानी दुर्गा यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
समितीचे कार्यकर्ते माझ्यावर संतापले असून ते कधीही माझ्यावर हल्ला करतील, अशी भीती साध्वींनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. साध्वींच्या दाव्याला खोटे ठरवित नाशिकच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आव्हान दिले आहे.

Web Title: High court grilling over Dabholkar murder probe