कोकणात अतिवृष्टी! रायगडमधील तीन नद्यांना पूर, आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 09:15 AM2021-07-22T09:15:57+5:302021-07-22T09:16:52+5:30

अहोरात्र पडणाऱ्या पावसाने कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून रायगडमधील सावित्री आणि आंबा नद्यांना पूर आला आहे. काळ नदीने पाणीही वेगाने वाढत आहे.

heavy rains in Konkan and rivers in raigad flooded and red alert for torrential rains even today | कोकणात अतिवृष्टी! रायगडमधील तीन नद्यांना पूर, आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

कोकणात अतिवृष्टी! रायगडमधील तीन नद्यांना पूर, आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/पुणे : अहोरात्र पडणाऱ्या पावसाने कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून रायगडमधील सावित्री आणि आंबा नद्यांना पूर आला आहे. काळ नदीने पाणीही वेगाने वाढत आहे. पालघरच्या शहरी भागात पाण्याचा निचरा होत नसतानाच जव्हारसारख्या डोंगरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जोरदार वृष्टी सुरूच आहे. 

हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला उद्या, गुरुवारीही पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि पाली-सुधागड तालुक्यात धुवाधार पाऊस सुरुच आहे. काळ, सावित्री आणि आंबा नदीने राैद्र रुप धारण केले आहे. महाड शहरासह बिरवाडी एमआयडीसी क्षेत्रात पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पाली परिसरातील आंबा नदीला पूर आल्याने जांभूळपाडा, भेरव आणि पाली हे महत्वाचे पूल पाण्याखाली जाऊन वाहतुक ठप्प झाली होती.  

१ जून ते २१ जुलैपर्यंत मुंबई उपनगर, रत्नागिरी, जालना आणि परभणी या जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. मुंबई शहर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत २० ते ५९ टक्क्यांदरम्यान पाऊस झाला आहे. पालघर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, वर्धा, जळगाव, बुलडाणा, वाशिम, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत सर्वसाधारण पाऊस झाला. नंदुरबार, धुळे, अकोला आणि गोंदिया या जिल्ह्यांत उणे २० टक्क्यांखाली पाऊस झाला आहे. हे चार जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे अधिकारी जयंता सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्याला मुसळधार ते अतिमुसळधार तर मध्य महाराष्ट्रालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा वाहील.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासांसाठी कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. २२ जुलै रोजी कोकण, गोव्यात, मध्य महाराष्ट्रात घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. २३ आणि २४ जुलै रोजीही हवामान असेच राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पंदेरी (ता. दापोली) रस्त्यावर दरड कोसळली आहे. तसेच चिपळूण-वेरळ रस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू आहे. गुहागर तालुक्यात कारूळ येथील जमिनीला भेग पडल्याने २० कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. रायगडमध्ये सुधागड-पाली तालुक्यात आंबा नदीला पूर आला असून जांभूळपाडा, भेरव आणि पाली हे महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली  आहे. मराठवाड्यात लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला.

विदर्भात दमदार पाऊस

नागपूरसह विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस सुरू आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात विश्रोळी धरणाची तीन दारे उघडण्यात आली आहेत. वर्धा जिल्ह्यात आर्वी-वर्धमनेरी मार्गावर तीन तास वाहतूक ठप्प होती. समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला धरणाचे आठ दरवाजे उघडल्याने आठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच असा अपेक्षित पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात धुमशान

- कोल्हापूर जिल्ह्यात मात्र धुवाधार पाऊस कोसळत आहे. गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. एक राज्य व दोन प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून, २२ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

- साताऱ्यातही पावसाचा जोर वाढला असून नवजा आणि महाबळेश्वरला सलग दुसऱ्या दिवशीही १०० मिलिमीटरहून जास्त पावसाची नोंद झाली. यवतेश्वर घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर-पाचगणी रस्ता बंद करण्यात आला आहे. वाई तालुक्यातील कोंढावळे येथे घराचे छत अंगावर पडून वृध्दाचा मृत्यू झाला. वामन जाधव असे मृताचे नाव आहे. कोयना धरणात २४ तासांत सव्वातीन टीएमसी पाणी वाढले. सांगली जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस आहे.

मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता

- गुरुवारी कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांसह कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे. 

- मराठवाड्यातील नांदेड, लातूर, जालना, परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: heavy rains in Konkan and rivers in raigad flooded and red alert for torrential rains even today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app