इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:58 IST2025-11-12T16:56:35+5:302025-11-12T16:58:20+5:30
Eknath Shinde-Uddhav Thackeray Shivsena: आपल्या राज्यात एक असे निमशहर आहे, असा तालुका आहे जिथे राजकारणात काहीही होऊ शकते. आजही एक मोठी राजकीय घडामोड घडू लागली आहे.

इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
मुंबई: आपल्या राज्यात एक असे निमशहर आहे, असा तालुका आहे जिथे राजकारणात काहीही होऊ शकते. या तालुक्याने मुख्यमंत्रीही दिला, तोच विरोधीपक्ष नेताही दिला. याच जबरदस्त दरारा असलेल्या विरोधी पक्ष नेत्याचा दंगलीत बंगलाही फोडला, जाळला गेला. अनेक राजकीय घडामोडी घडल्या, आजही एक मोठी राजकीय घडामोड घडू लागली आहे. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून विळ्या-भोपळ्याचे नाते असलेले उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन गट भाजपविरोधात एकत्र येऊन लढणार आहेत.
अख्ख्या राज्यात उद्धव ठाकरेंसाठी अभद्रहून अभद्र असलेल्या या युतीची नाही तर आघाडीची कणकवलीत पायाभरणी केली जात आहे. या शिंदे-ठाकरे शिवसेना आघाडीवरून उद्धव ठाकरे नाराज असल्याचे वृत्त आले होते. स्वत: उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात या स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटासोबत युती करू नका, असे आदेश दिले होते. परंतू, कणकवलीत स्थानिक नेत्यांनी अशा आघाडीला खुद्द उद्धव ठाकरेंचीच परवानगी असल्याचे जाहीर करून टाकले आहे.
कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज याबाबत खुलासा केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात होणारी युती ही शिंदे सेनेसोबत नसून ‘शहर विकास आघाडी’च्या स्वरूपात असेल, अशी माहिती वैभव नाईक यांनी दिली. या आघाडीत सर्व पक्षांचा समावेश असेल आणि ही पक्षविरहित युती असेल, असे म्हणत नाईक यांनी शिंदे गटासोबत जात असल्याचे आरोप मान्यही केले नाहीत आणि फेटाळले देखील नाहीत.
तसेच उद्धव ठाकरेंना आम्ही या युतीची गरज का आहे हे पटवून दिले आहे. त्यांची याला सहमती असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर हे पक्षांतर करणार असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सध्या ते आमच्यासोबत आहेत, पुढेही सोबत असलेल्यांबरोबर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी सर्वांची बैठक झाली, पण...
मंगळवारी कणकवलीमध्ये या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक झाली. यामध्ये दोन्ही शिवसेनेचे छोटे-मोठे नेते उपस्थित होते. परंतू, या बैठकीतून अद्याप काही ठरले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.