Walmik Karad Latest News: दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले. पण, कारागृहात वाल्मीक कराडच्या सेवेसाठी पोलीस ठेवले असल्याचा स्फोटक दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 'रात्री मस्त मैफिल रंगत असते. तो कारागृहात असल्याचे जाणवू दिले जात नाही', असे म्हणत आव्हाडांनी महायुती सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वाल्मीक कराडला प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार केल्यानंतर त्याला सुट्टी देण्यात आली. वाल्मीक कराडची रवानगी पुन्हा बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. पण, तिथे त्यांच्या सेवेसाठी सात पोलीस ठेवल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे.
सात हवालदार तैनात ठेवलेत
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, "हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मीक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदिवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत", असा दावा आव्हाड यांनी केला आहे.
कारागृहात रात्री मैफिली रंगतात
"बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते 'आपोआप' वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते", असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
"एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत", असे म्हणत आव्हाडांनी महायुती सरकारला सुनावले आहे.
"अर्थात, तो वाल्मिक कराड आहे... वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा", असे म्हणत आव्हाडांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे.